विशेष प्रतिनिधी | नगरी नगरी :
अहिल्यानगर जिल्ह्यात पेट्रोल व डिझेल तुटवड्याबाबत समाजमाध्यमांवर पसरत असलेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने कठोर निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सार्वजनिक सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सुट्या स्वरूपात इंधन विक्रीवर तात्काळ बंदी लागू केली आहे.

⛽ ‘फक्त वाहनातच इंधन’ — नवीन नियम लागू
पेट्रोलियम नियम २००२ अंतर्गत काढलेल्या आदेशानुसार, आता जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल व डिझेल केवळ वाहनांच्या टाकीतच भरले जाणार आहे. कॅन, बाटल्या, डबे किंवा इतर कोणत्याही भांड्यात इंधन देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
📹 पंपांवर सीसीटीव्ही व नोंदी अनिवार्य
प्रशासनाने सर्व पेट्रोल पंपांना सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवणे आणि इंधन विक्रीच्या नोंदी नियमित व पारदर्शकपणे ठेवणे बंधनकारक केले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित पंप चालक व व्यवस्थापकांवर सोपवण्यात आली आहे.
⚠️ नियमभंग केल्यास कडक कारवाई
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पेट्रोलियम नियम २००२, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत कठोर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.
📦 इंधन साठा मुबलक ठेवण्याच्या सूचना
दरम्यान, जिल्ह्यात इंधनाची कमतरता भासू नये यासाठी पेट्रोलियम कंपन्यांना सर्व पंपांवर पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवताआवश्यक तेवढेच इंधन घ्यावे, अफवा टाळाव्यात, संयम बाळगावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील इंधन वितरण अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.