अहिल्यानगर । ०२.०३ । नगरी नगरी :
( रमजान ) हातमपुरा येथील जुन्या कलेक्टर ऑफिस शेजारील कासिमखानी मस्जिद येथे रविवारी सायंकाळी सर्वधर्मीय सद्भावनेच्या वातावरणात दावते रोजा इफ्तार कार्यक्रम उत्साहात पार पडला. विविध धर्मीय बांधवांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकतेचा संदेश दिला.
हा कार्यक्रम जमात-ए-इस्लामी हिंद, Jamaat-e-Islami Hind, सावित्री फातिमा सद्भावना मंच ( अहिल्यानगर) तसेच स्टुडंटस् इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. समाजात बंधुभाव, ऐक्य आणि परस्पर सलोखा वृद्धिंगत करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
रमजानचा संदेश : संयम, आत्मशुद्धी आणि मानवता
कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना डॉ. इकराम काटेवाला म्हणाले, “रमजान हा आत्मशुद्धी, संयम आणि मानवतेचा संदेश देणारा पवित्र महिना आहे. रोजा म्हणजे केवळ भूक-तहान सहन करणे नव्हे, तर आपल्या वागणुकीत चांगुलपणा, सहनशीलता आणि बंधुभाव वाढवण्याची संधी आहे.”
इफ्तार पार्टी ही हिंदू-मुस्लिम एकतेचे जिवंत प्रतीक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
एकतेचा आदर्श उपक्रम
( रमजान ) नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी सांगितले की, “दावत-ए- इफ्तारसारखे कार्यक्रम समाजात प्रेम, बंधुभाव आणि एकता वाढवतात. सर्व धर्मीयांनी एकत्र येऊन सण-उत्सव साजरे करणे ही आपल्या देशाची परंपरा आहे.”
हरदिन मॉर्निंग ग्रुप भिंगारचे अध्यक्ष संजय सपकाळ यांनी युवकांच्या पुढाकाराचे कौतुक करताना नमूद केले की, “समाजात एकता निर्माण करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेणे अत्यंत गरजेचे आहे. हा कार्यक्रम सर्व धर्मीयांना एकत्र आणणारा आदर्श उपक्रम ठरला आहे.”
इफ्तार म्हणजे काय?
रोजा (उपवास) दिवसभर पाळल्यानंतर, सूर्यास्ताच्या वेळी मगरीबच्या नमाजासाठी अजान झाल्यावर जो आहार घेतला जातो, त्याला इफ्तार म्हणतात. हा सूर्यास्तानंतर उपवास सोडण्यासाठी घेतला जाणारा पहिला आहार असतो. इफ्तारच्या वेळी साधारणपणे खजूर, पाणी, फळे किंवा हलका पदार्थ खाऊन रोजा सोडला जातो. त्यानंतर मुस्लिम बांधव त्वरित मगरीबची नमाज अदा करतात आणि मग परत येऊन इतर पदार्थांचा आस्वाद घेतात.
सावित्री, फातेमा ते शिवराय यांच्या विचारांची गरज
( रमजान ) कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी सध्याच्या सामाजिक परिस्थितीत तरुणांना तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीं पासून दूर ठेवण्याची आवश्यकता व्यक्त केली. आज देशाला सावित्री-फातेमा, Chhatrapati Shivaji Maharaj, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या समतेच्या आणि एकतेच्या विचारांची गरज असल्याचे मत वक्त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्र इफ्तार करून सर्वधर्म समभाव, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला. उपस्थितांनी अशा उपक्रमांची गरज व्यक्त करत कार्यक्रमाचे मनापासून कौतुक केले.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, नगरसेवक शम्स खान, माजी नगरसेवक फय्याज शेख (केबलवाले), साहेबान जहागीरदार, संजय सपकाळ, सचिन चोपडा, अॅड. बोरुडे तसेच शहरातील विविध धर्मगुरू, राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुश्ताक पठाण यांनी केले तर आभार प्रदर्शन फिरोज शेख यांनी मानले.