घरगुती एलपीजी गॅस पुरवठा सुरळीत ठेवा; कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कारवाई – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

अहिल्यानगर । १३.०२ । नगरी नगरी : जिल्ह्यातील सर्व गॅस वितरकांनी घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा अखंडित व सुरळीत ठेवावा. वितरणात…
1 Min Read 0 274

अहिल्यानगर । १३.०२ । नगरी नगरी :

जिल्ह्यातील सर्व गॅस वितरकांनी घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा अखंडित व सुरळीत ठेवावा. वितरणात विलंब, अनियमितता किंवा कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. मात्र प्रामाणिकपणे काम करणाऱ्या वितरकांना प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व एलपीजी गॅस वितरकांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी एम. के. चौधरी, बीपीसीएलचे राजकुमार मिश्रा तसेच जिल्ह्यातील विविध गॅस एजन्सींचे वितरक उपस्थित होते.

⏱️ बुकिंग मर्यादा व ओटीपी पडताळणी अनिवार्य

केंद्र शासनाच्या धोरणानुसार शहरी भागातील ग्राहकांसाठी गॅस बुकिंगची मर्यादा २५ दिवस, तर ग्रामीण भागासाठी ४५ दिवस निश्चित करण्यात आली आहे. गॅस सिलिंडरचे वितरण ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईलवर पाठविलेल्या ओटीपी पडताळणीनंतरच करण्यात येणार आहे. तसेच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

दरम्यान, काही ग्राहकांना सिलेंडर मिळाले नसतानाही त्यांच्या मोबाईलकर सिलेंडर डिलिव्हर असे मेसेज येतात . वास्तविक अशा ग्राहकांनी सिलेंडर बुक केलेले नव्हते. या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी दूरध्वनी केला असता गॅस वितरकांशी संपर्क होऊ शकला नाही. 

त्यामुळे सर्व ग्राहकांनी तातडीने ई-केवायसी पूर्ण करून अधिकृत पद्धतीनेच गॅस घ्यावा, तसेच अनावश्यक साठेबाजी टाळावी आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी केले.

🔍 गॅस गोदामांची विशेष तपासणी

एलपीजी गॅसचा साठा, वितरण व्यवस्था आणि सुरक्षेची खात्री करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व गॅस गोदामांची विशेष तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी तालुकानिहाय विशेष पथके स्थापन करण्यात आली असून ही पथके गोदामांना भेट देऊन साठा नोंदी, सुरक्षा उपाययोजना, वितरण प्रणाली आणि नियमांचे पालन यांची तपासणी करणार आहेत. तपासणीत कोणतीही अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

📦 जिल्ह्यात गॅसचा पुरेसा साठा

जिल्ह्यात सध्या एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊन अनावश्यक साठेबाजी करू नये, असेही त्यांनी सांगितले. वितरकांनी बुकिंगच्या क्रमाने वेळेत गॅस वितरण करावे आणि ग्रामीण व दुर्गम भागातही पुरवठा नियमित राहील याची विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश देण्यात आले.

ग्राहकांना वेळेत सेवा देणे, वितरणात पारदर्शकता राखणे आणि तक्रारींचे तात्काळ निवारण करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

⚖️ काळाबाजार व व्यावसायिक वापरावर लक्ष

घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर होणार नाही यासाठी नियमित तपासणी केली जाणार आहे. अतिरिक्त दर आकारणी, बेकायदेशीर साठेबाजी किंवा काळाबाजार आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

एलपीजी गॅस पुरवठा व्यवस्थेवर जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवले जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी स्पष्ट केले.

बैठकीत गॅस सिलिंडरची उपलब्धता, साठा, बुकिंगनंतर वितरणाचा कालावधी, ग्रामीण व शहरी भागातील पुरवठा स्थिती तसेच वितरण व्यवस्थेतील अडचणी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस सर्व तहसीलदार व गट विकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media

Share this content