जुने मनपा सभागृह पुन्हा उभारी घेणार? वारसा जतनासाठी उपमहापौर धनंजय जाधव यांचा पुढाकार

अहिल्यानगर । अमोल भांबरकर । नगरी नगरी  : शहराच्या ऐतिहासिक वारशाचे प्रतीक असलेल्या जुने महानगरपालिका कार्यालय आणि सभागृहाचे जतन करणे…
1 Min Read 0 197

अहिल्यानगर । अमोल भांबरकर । नगरी नगरी  :

शहराच्या ऐतिहासिक वारशाचे प्रतीक असलेल्या जुने महानगरपालिका कार्यालय आणि सभागृहाचे जतन करणे अत्यंत गरजेचे असून येथील तैलचित्रे व ऐतिहासिक वारसा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची भूमिका उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांनी व्यक्त केली. त्यांनी आज जुने मनपा कार्यालयाला भेट देत विविध विभागांच्या कामकाजाची पाहणी केली आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

या भेटीदरम्यान उपमहापौर जाधव यांनी कार्यालयातील प्रशासकीय कामकाज, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा आणि विभागनिहाय कार्यपद्धतीचा आढावा घेतला. विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांशी चर्चा करताना कार्यालयीन कामकाजात येणाऱ्या अडचणी, सुविधा आणि नागरिकांना सेवा देताना येणाऱ्या समस्यांबाबत माहिती घेतली. कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या अडचणी सोडवण्यासाठी आवश्यक त्या स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

कार्यालय परिसराची पाहणी करताना काही ठिकाणी अस्वच्छता आढळून आल्याने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ स्वच्छतेच्या सूचना दिल्या. मोठ्या प्रमाणात नागरिक या कार्यालयात येत असल्याने परिसर स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

🔥 आगीत जळालेले ऐतिहासिक सभागृह पाहून व्यक्त केली खंत

यानंतर उपमहापौर जाधव यांनी काही वर्षांपूर्वी आगीत जळून गेलेल्या जुने मनपा सभागृहाचीही पाहणी केली. या ऐतिहासिक सभागृहाची सध्याची दुरवस्था पाहून त्यांनी खंत व्यक्त केली आणि त्या ठिकाणी उभे राहून जुन्या आठवणींना उजाळा दिला.

आठवणी सांगताना त्यांनी म्हटले की, “लहानपणी मी माझे वडील स्वर्गीय कृष्णाभाऊ जाधव यांच्यासोबत या सभागृहात आलो होतो. त्या काळात अरुणकाका जगताप, शंकरराव घुले आणि अभय तात्या आगरकर नगराध्यक्ष म्हणून कार्यरत होते, तर माझे वडील उपनगराध्यक्ष होते. त्या सभागृहात अनेक मान्यवरांची तैलचित्रे लावलेली होती. आज त्या ठिकाणाची झालेली दुरवस्था पाहून मनाला वेदना होतात.”

🖼️ ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी प्रयत्न

हे सभागृह शहराच्या इतिहासाचा महत्त्वाचा भाग असून त्याचे जतन होणे अत्यावश्यक आहे. येथे पूर्वी लावलेली तैलचित्रे आणि ऐतिहासिक वारसा पुन्हा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

उपमहापौरांच्या या भेटीनंतर जुने मनपा कार्यालय आणि ऐतिहासिक सभागृहाच्या जतनासाठी प्रशासनाकडून सकारात्मक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा शहरातील नागरिक आणि कर्मचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media

Share this content