महाराष्ट्र । ०४.०३ । नगरी नगरी :
राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत असून उष्णतेचा चटका दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. कधी उकाडा तर कधी अवकाळी पावसाचे वातावरण अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने महत्त्वाचा इशारा देत राज्यातील काही भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून उन्हाची तीव्रता दुपारच्या वेळी अधिक जाणवत आहे. विशेषतः दुपारी १ नंतर उष्णतेचा चटका अधिक तीव्र होत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
अकोल्यात देशातील उच्चांकी तापमान :
देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला येथे ३८.५ अंश सेल्सिअस इतकी झाली आहे. यामुळे विदर्भात उष्णतेची लाट अधिक तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर अमरावती आणि वर्धा येथेही तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे.
पुण्यात सलग दोन दिवस तापमान ३५ पार :
पुणे शहर आणि परिसरातही उन्हाळ्याची चाहूल स्पष्टपणे जाणवू लागली आहे. मार्चच्या सुरुवातीलाच सलग दोन दिवस पुण्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव आता पूर्णपणे कमी झाला असल्याने उष्णतेत वाढ होत आहे.
कोकणात उष्ण व दमट वातावरण :
मुंबईसह कोकण पट्ट्यातही उष्णता आणि दमट वातावरणामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि कोकणातील काही भागात उष्ण व दमट हवामानाचा ‘यलो अलर्ट’ हवामान विभागाने जारी केला आहे. काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून त्यामुळे उकाडा आणखी वाढू शकतो.
देशातील नीचांकी तापमान अयोध्येत
देशातील सर्वात कमी तापमानाची नोंद उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे १० अंश सेल्सिअस इतकी झाली आहे. तर महाराष्ट्रातील नीचांकी तापमान धुळे येथे १२.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.
नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन
हवामान विभागाने नागरिकांना विशेषतः दुपारी १ ते ४ या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी पिणे, हलके व सूती कपडे परिधान करणे तसेच उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी किंवा छत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.
सध्या राज्यातील हवामान झपाट्याने बदलत असल्याने उष्णता, दमट वातावरण आणि ढगाळ परिस्थितीचा परिणाम पुढील काही दिवस जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत सतर्क राहणे गरजेचे आहे.