शेवगाव । लक्ष्मण मडके । नगरी नगरी :
येथील मौजे ठाकूर निमगाव गावाचा जीवनाधार ठरलेल्या पाझर तलावातून सुरू असलेल्या बेकायदा पाणी उपशामुळे गावात संतापाची लाट उसळली आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून काही शेतकऱ्यांनी तलावावर ८ ते १० मोटारी टाकून मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा सुरू ठेवला असून तलावातील पाणी साठा अवघ्या २५ टक्क्यांवर आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सुमारे ३ हजार लोकसंख्या असलेल्या ठाकूर निमगावची पिण्याच्या पाण्याची योजना याच तलावावर अवलंबून आहे. १९७२ पासून गावाचा जीवनाधार ठरलेल्या या पाझर तलावामुळे परिसरातील भूजल पातळी स्थिर राहण्यास मदत झाली आणि शेतीला ओलित मिळाले. मात्र सध्या सुरू असलेल्या बेकायदा पाणी उपशामुळे गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्यावरच गदा येण्याची भीती व्यक्त होत आहे.
तहसीलदारांकडे निवेदन; जिल्हा प्रशासनाचे लक्ष
या गंभीर प्रकाराबाबत ग्रामस्थांनी तहसीलदार, शेवगाव यांच्याकडे निवेदन देत तातडीची कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच या निवेदनाची प्रत निवासी उपजिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांनाही पाठविण्यात आली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर पोहोचले असून कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
“दरवर्षीचीच पुनरावृत्ती; यंदा सहन करणार नाही”
दरवर्षी काही शेतकरी बेकायदा मोटारी टाकून तलावातून पाणी उपसा करतात. याबाबत समज देऊनही काही जण दांडगाईची भाषा करतात, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
“पाणी उपसा तात्काळ थांबवला नाही, तर गावावर टँकरची वेळ येईल. जनावरांसह नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागेल,” असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
ग्रामस्थांच्या मागण्या
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे खालील मागण्या केल्या आहेत :
1️⃣ तलावावरील सर्व बेकायदा मोटारी तात्काळ जप्त कराव्यात.
2️⃣ संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
या निवेदनावर गहिनीनाथ पंढरीनाथ कातकडे, राजेंद्र तुकाराम कातकडे, बबन जगन्नाथ निजवे, बाळासाहेब भाऊसाहेब निजवे, रेवन्नाथ जगन्नाथ कातकडे, छबू फकीरा रणदिवे, गोरक्ष पंढरीनाथ कातकडे, परमेश्वर ज्ञानदेव घावटे, आप्पासाहेब लक्ष्मण गवंदे, रमेश कर्डिले, स्वप्निल निजवे, प्रशांत कातकडे, मयूर निजवे, भारत घावटे, नामदेव खेडकर, एकनाथ घोरपडे, पंढरीनाथ घनवट, जयचंद घनवट, श्रीकिसन घनवट, कुमार घनवट, साईनाथ घनवट, राजू घनवट, दिलीप घनवट, भारत घनवट, संभाजी अनंतपुरी आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
प्रशासनासमोर मोठे आव्हान
“पाणी हा आमचा मूलभूत हक्क आहे. तो हिरावण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही शांत बसणार नाही,” असा स्पष्ट इशारा ठाकूर निमगावकरांनी प्रशासनाला दिला आहे.
आता तहसील कार्यालय आणि जिल्हा प्रशासन किती जलद कारवाई करून मोटारी काढते आणि तलावाचे संरक्षण करते, याकडे संपूर्ण शेवगाव तालुक्याचे लक्ष लागले आहे. ठाकूर निमगावकरांचा हा लढा पाण्यासाठीचा संघर्ष ठरत असून प्रशासनाची खरी परीक्षा आता सुरू झाली आहे.