मुंबई | ७.०३ । नगरी नगरी :
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेत नाशिकच्या प्रेरणा कैलास खवळे हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अंतिम निकालात ९१३ वी रॅंक मिळवत तिने प्रशासकीय सेवेत जाण्याचे आपले स्वप्न साकार केले. तिच्या या दैदीप्यमान यशाबद्दल अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे आणि निबंधक इंदिरा अस्वार यांनी तिचा गौरव केला.
केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा मुख्य परीक्षा ऑगस्ट २०२५ मध्ये पार पडली होती, तर डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मुलाखती घेण्यात आल्या. या प्रक्रियेनंतर जाहीर झालेल्या अंतिम निकालात प्रेरणाने उल्लेखनीय कामगिरी करत देशातील प्रतिष्ठेच्या सेवेत स्थान मिळवले.
समाजासाठी प्रेरणादायी यश
मातंग समाजातील प्रेरणा खवळे हिने मिळवलेले हे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. अनुसूचित जातीतील, विशेषतः मातंग समाजातील उमेदवारांना यूपीएससी मुलाखतीसाठी महाराष्ट्र शासनाच्या अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) मार्फत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. प्रेरणाला देखील या योजनेचा लाभ मिळाल्यामुळे तिच्या मुलाखतीच्या तयारीतील आर्थिक अडथळे दूर होण्यास मदत झाली.
‘आर्टी’चे मोलाचे मार्गदर्शन
या यशाबद्दल बोलताना सुनील वारे म्हणाले,
“अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या यूपीएससी परीक्षेत प्रेरणाने मिळवलेले यश हे तिच्या जिद्दीचे आणि परिश्रमाचे फलित आहे. आर्टीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिल्लीतील नामांकित संस्थांमध्ये प्रशिक्षणाची संधी दिली जाते. तसेच मुलाखतीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांच्या स्वप्नांना बळ दिले जाते.”
प्रेरणा खवळेच्या या यशामुळे नाशिकसह राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना मोठी प्रेरणा मिळाली असून जिद्द आणि सातत्यपूर्ण मेहनतीने कोणतेही स्वप्न साकार करता येते, याची प्रचिती पुन्हा एकदा मिळाली आहे.