कुणी कसं वागावं हा आपला विषयच नाही. आपण इतरांशी कसं वागायचं, एवढयापुरताच आपला विषय ! कोण चुकतंय, चुकलंय ह्याचा हिशेब मांडत बसलो तर वेळ पुरणार नाही. आणि आपण स्वतः इतरांशी कसं वागलो याचा तर हिशेबही लागणार नाही. तेव्हा भूतकाळ विसरून जाणे, भविष्याची चिंता न करणे आणि फक्त वर्तमानात जगणे हेच आपल्या हिताचे आहे.
आपण सकाळी उठलो म्हणजे आज आपण जिवंत आहोत. पण त्या क्षणापुरतंच . दिवसभरात काय घडणार , किंवा घडावं हे आपण नाही ठरवू शकत. रात्री जेव्हा गाढ झोप लागते तेव्हा आपलं एका दिवसाचं चक्र पूर्ण झालेलं असतं. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच सुरु राहतं. जीवन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून उगवलेल्या दिवसाचे चक्र पूर्ण करणे एवढंच. पण हे जीवन सजवणं, त्यात रंग भरणं हे आपलं काम. ते नाही केलं तर बिघडणार काही नाही पण तुम्ही आलेला दिवस ढकलत आहात हे सिद्ध होतं.
त्यासाठीच जीवनात रंग भरायची कला शिकून घायला हवी. या रंगभरणासाठी लागणारं साहित्य म्हणजे आपलं मन शांत, निरपेक्ष , प्रेमळ ठेवणं. आपली वाचा सकारात्मक ठेवणं , कुणाहीबद्दल , मग ज्या व्यक्तिकडून तुम्हाला त्रास झालेला असेल अशा व्यक्तिबद्दलही मनांत कुठलीही द्वेष भावना न ठेवता त्याच्याशी निष्कपट वागणं, सौजन्याने वागणं या सगळ्या गोष्टी.
प्रत्येकजण आयुष्य जगतो. ते जगताना चुकीची पावलं पडायला लागली तर लगेच दुरुस्ती करता यायला हवीत. ते जमलं तर मग तुमचं भविष्य चांगलंच असणार . पण नेमकं ते ओळखलं नाही, चुका टाळल्या नाहीत तर मग त्याचे भविष्यकालीन परिणाम सहन करण्याशिवाय गत्यंतर नाही. त्यातून सुटका नाही. चला, भूतकाळात झालेल्या चुकांचे परिणाम तर भोगावेच लागणार आहेत. पण निदान त्यातून काही तरी शिकून भविष्यात पुन्हा हे ‘ भोगणे ‘ नको म्हणून वर्तमानात बदल करायला हवा. ठरवलं तर सगळं शक्य आहे, फक्त तुमच्या इच्छाशक्तीची तीव्रता किती आहे यावर ते अवलंबून आहे.
– ..KD