मनातलं… २

आपण नात्यांच्या बाबतीत फार रुक्ष झालो आहोत का ? किंवा याच्या उलट, नात्यांच्याबाबतीत आपण फार हळवे आहोत का ? या…
1 Min Read 0 207

आपण नात्यांच्या बाबतीत फार रुक्ष झालो आहोत का ? किंवा याच्या उलट, नात्यांच्याबाबतीत आपण फार हळवे आहोत का ?

या दोन्ही भावनांमध्ये योग्य किंवा खरंच विचार करावा अशी भावना कोणती ? खरं तर दोन्ही भावना या विचार करायला लावणाऱ्याच आहेत. कारण त्या आपल्या नात्यांच्या बाबतीत आहेत. आणि जेव्हा आपण नात्यांचा विचार करतो तेव्हा ही नाती अगदी जवळची असतात. म्हणजे आई – वडिल , भाऊ – बहिण, नवरा- बायको या कॅटेगरीतली. आणि मग या नात्यांच्याबाबतीतला रुक्षपणा किंवा हळवेपणा याचा विचार करायला लागलो की, अवघ्या जगण्याचे चलचित्र डोळ्यांसमोर तरळू लागते. लहाणपणी भावंडांमधली भांडणं – प्रेम, आई- वडिलांचा मार – प्रेम, नवरा- बायकोमधील नवीन लग्न झाल्यानंतरचा सुवर्णकाळ हे सगळंच दिसू लागतं. आणि मग जाणीव होऊ लागते, या नात्यांमध्ये वर्तमानस्थितीत असलेल्या भावबंधांची . जे काळानुरुप एकतर प्रचंड घट्ट झालेले असतात किंवा या उलट अतिशय कमकुवत झालेले असतात. आणि या दोन्ही भावना माणसाला सुखावह नसतात. घट्ट झालेल्या नात्यांचाही त्रास होऊ लागतो आणि कमकुवत झालेल्या नात्यांमुळं तर माणूस आतून तुटून गेलेला असतो.

तेव्हा अशी नाती जपायची कशी ? हा मोठा भावनिक विचार मनात सतत डोकावत राहतो. याचं उत्तर अवघड आहे. कारण ज्या नात्यांचा उल्लेख आपण या ठिकाणी केला ती नाती आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेली असतात. पण मग नेमकी काय चूक होते किंवा असं काय बिनसतं की, या नात्यांचा घट्टपणा किंवा कमकुवतपणा यावर चर्चा व्हावी ? हो , बिनसतं हे नक्की . प्रत्येक नात्यातलं हे बिनसलेपण वेगळं असतं.

आई-वडिलांच्याबाबतीत, बऱ्याचदा मुलाकडून असलेल्या अपेक्षा आणि मुलाच्या बाबतीत, आई-वडिलांना नेमकं कसं सांभाळावं ? हा एक मुद्दा असू शकतो. या आई-बाबांना दोन-चार मुलं असतील तर यांना सांभाळायचं कुणी ? हा आई- बाबा आणि ती भावंडं यांच्यातला मुद्दा असू शकतो आणि आई-वडिलांकडून मुलांच्या बाबतीत होणारा भेदभाव हा दुर्लक्षित पण महत्त्वाचा मुद्दा असू शकतो.

भाऊ – बहिण किंवा भाऊ – भाऊ या नात्यांमध्ये बिनसलेपण येण्याच्या इतर कुठल्याही कारणापेक्षा परिणामकारक कारण म्हणजे ‘पैसा’. पैसा मोठा झाला की ही जन्मापासून एकमेकांना प्रेमाने बांधलेली नाती पैशाने वेगळी होतात. बहुतेकदा वडिलोपार्जित संपत्तीची वाटणी हे एक महत्त्वाचं कारण त्यामागे असतं किंवा एकमेकांची साथ अचानक सोडणं हेही एक कारण असतं. आणि मग या वादात पैशाबरोबरच एकमेकांसाठी केलेल्या कामाचे उपकारात रुपांतर केले जाते. आणि इथेच या नात्याला कायमचा तडा जातो.

नवरा-बायकोच्या नात्यामध्ये सुरुवातीची १० -१५ वर्षे लुटूपुटूच्या भांडणात, प्रेमात भर्रकन निघून जातात . पण या वाटचालीत, दोघांपैकी एकाचा जरी पाय घसरला तरी संसाराची वाट लागून जाते. क्वचितप्रसंगी या दोघांपैकी एखादा कालांतराने सामंजस्याची भूमिका घेतो आणि बुडत जाणारी संसाराची नाव वाचते. जर हे झालं नाही तर या नात्याचा निर्णय कोर्टातच होतो. कोर्ट कायदेशीर मार्गाने दोघांना विभक्त करते , पण दुभंगलेली मनं सांधायला पुन्हा एखादं तप जावं लागतं.

काय केलं पाहिजे ? नात्यांमध्ये येणारी ही वादळं शांत करण्यासाठी काय करायला हवं ? उत्तर खूप सोपं आहे. जन्मोजन्मी सोबत असणाऱ्या या नात्यांचा बराचसा काळ हा प्रेमातच जातो. कालांतराने या प्रेमाची जागा अहंकार घेतो. मग तो अहंकार पैशाचा, पदाचा , अगदी प्रेमाचाही अहंकार असतो. जेव्हा हा अहंकार मोठा होतो तेव्हा नात्यांची किंमत शून्य झालेली असते. तेव्हा आपण आपल्यातलं प्रेम जपायचं कि अहंकाराच्या आहारी जायचं हे त्या नात्यांचं आपल्या आयुष्यातलं स्थान काय आहे ? त्यावर अवलंबून आहे. नात्यातली भावनिक गरज, आधार हा त्या नात्याला वाचवतो हे मात्र नक्की !

या विषयाशी निगडित असलेला एक अतिशय सुंदर मेसेज मला व्हॉटसॲपवर आला,

Someone asked, what is the difference between age and life ? and the beautiful answer is, the time spent without loved ones is just an AGE and the moments spent with loved ones is LIFE.

पटतंय ना ?

– ..KD

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media

Share this content