परिवर्तन संसार का नियम है । हे गीतेत सांगितलं आहे. पण आपण हे परिवर्तन सहजासहजी स्वीकारतो का ? अर्थात आनंदी घटनांमुळे आयुष्यात होणारं परिवर्तन आपण सेलिब्रेशन करून स्वीकारतो. पण अशा काही घटना असतात, ज्यामुळे तुमचं सुखनैव आयुष्य काही काळापुरतं का होईना पण संकटात येतं. हा बदल आपण स्वीकारतो का ? नाही. कारण आपल्याला त्रासदायक परिवर्तन नको असतं. मग आपण ते स्वीकारत नाही. रडत राहतो. माझ्याच वाट्याला असं का ? मी कधी कुणाचं वाईट केलं ? मग मला हे भोग का ? यातून लवकर बाहेर पडलो नाही तर अगदी सहज आपण नैराश्यात ( डिप्रेशन ) जातो. काहीजण अंधश्रध्देचे मार्ग स्वीकारतात. कुठुन तरी अंगावर आलेलं संकट लगेचच्या लगेच दूर व्हावं यासाठी माणूस वेडापिसा होतो. पण ही परिस्थिती काही काळापुरती आहे, हे काही तो समजून घेत नाही. आत्ता दुःख आहे. पण रोज नवा दिवस उगवणार आहे. आज नाही, उदया नाही, परवा नाही, पण एक दिवस असा उगवेल की तुमच्या आयुष्यात पुनः परिवर्तन झालेलं असेल.
कारण परिवर्तन हा संसाराचा नियम आहे हे त्रिकालाबाधित सत्य आहे. पण मन शांत व्हायला तयार नाही. त्याला बटण दाबल्यासरशी लाईट लागते याची सवय झाली आहे. पण आयुष्य बटणावर चालत नाही. आयुष्य ही निसर्गाने उभी केलेली एक जिवंत प्रक्रिया आहे. या प्रक्रियेतून जाताना प्रत्येकाला जे जे त्याच्या वाटेत येईल त्याला तोंड देत पुढं जावंच लागणार आहे. इथे तुम्हाला चॉईस नाही. अगदी तुम्ही कितीही श्रीमंत असा किंवा गरीब. तुमच्या मर्जीने काही होणार नाही. नैसर्गिक न्यायाने जे जे घडेल ते ते तुम्हाला मान्य करावे लागेल. तुम्ही एवढंच करु शकता की, प्रसंग कुठलाही असो आपलं आत्मभान जागृत ठेवून आलेल्या परिस्थितीला उत्तम प्रकारे हाताळू शकता.
आयुष्यात येणारे प्रसंग तरी कोणते असतात, जिथे मनुष्य पूर्ण हतबल होतो. आनंदी प्रसंगही आयुष्य बदलून टाकतात. पण तेव्हा माणूस परिस्थितीला शाबासकी देत नाही. तो त्यावेळी स्वकर्तृत्वाची पाठ थोपटून घेतो. पण विपरित परिस्थितीत उदा. अचानक आलेलं किंवा दीर्घकाळाचं आजारपण, व्यापारात झालेलं प्रचंड प्रमाणातलं नुकसान किंवा मग रक्ताच्या नात्यात आलेली कटुता या प्रसंगांसाठी तो सुरुवातीला स्वतःला दोषी मानत नाही. जे काही घडलं त्याचं खापर दुसऱ्यावर फोडून तो स्वतःला वाचवू पाहतो. पण जसजसा काळ पुढं सरकत राहतो, तसतसं त्याला स्वतःतल्या दोषांची जाणीव होते. आणि अशी जाणीव व्हायला सुरुवात जरी झाली तरी तो मनुष्य चांगल्या किंवा योग्य मार्गावर येतो आहे याची खात्री बाळगावी. पण अहंभावाने पछाडलेल्या व्यक्तिवर कुठल्याच परिस्थितीचा परिणाम होत नाही. त्याच्या लेखी त्याने जे जे काही केलं , वागलं असेल तेच योग्य होतं, आहे आणि राहणार आहे. अशा व्यक्तिच्या बाबतीत त्याचे निर्णय योग्य की अयोग्य याचे उत्तर काळाशिवाय दुसरं कुणी देऊ शकत नाही.
मन शांत करायचं असेल, परिस्थितीतून मार्ग काढायचा असेल तर अहंकाराचं चिलखत उतरवून ठेवावं लागेल.
सोडून देता यायला हवं. मग तो द्वेष असो, राग असो, पराकोटीचं प्रेम असो, नात्यातली ओढ असो, आधाराची सवय असो, हळवेपणा असो. अपेक्षेची सवय दुःखाचं मूळ कारण आहे. ही सवय सोडून देता यायला हवी. थोडक्यात तटस्थ भावनेतून बघण्याची सवय लावून घेणे हा एक सर्वोत्तम मार्ग आहे. अर्थात त्यासाठी स्वतःला बदलणे ही पहिली पायरी आहे. पण मी स्वतःला बदलू शकत नाही, आणि इतरांनी बदलावं अशी अपेक्षा !
परिस्थिती कशीही असो, सत्याचा सरळ मार्ग आणि स्वतःवरचा आत्मविश्वास ढळू देता कामा नये आणि परिवर्तन संसार का नियम है । हे विसरता कामा नये .
– .. KD