अहिल्यानगर | प्रतिनिधी | नगरी नगरी :
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी माळीवाडा परिसरातील गणेश मंडळांनी फुले दांपत्य स्मारक समितीला पाठिंबा देत माळीवाडा वेस हटविण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. स्मारकाच्या जागेवर अतिक्रमणे आणि माळीवाडा वेशीमुळे जागा अपुरी पडत असल्याचे कारण पुढे करण्यात येत असून अतिक्रमण हटवून वेस पाडण्याची मागणी जोर धरत आहे. शहरातील तब्बल ६२ नगरसेवकांनी यासाठी पाठिंबा दर्शवित महापौर व उपमहापौरांकडे विशेष महासभा घेण्याची मागणी केली आहे.
🟩 गणेश मंडळांचा पाठिंबा
माळीवाडा परिसरातील दहा गणेश मंडळांनी फुले दांपत्य स्मारक समितीला अधिकृत पाठिंबा पत्र देत स्मारक उभारणीसाठी एकजूट दर्शविली. यासोबतच सकल मराठा समाज, कैकाडी समाज, पद्मशाली, साळी, कासार आदी विविध समाजघटकांनीही सक्रिय पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या चळवळीला व्यापक सामाजिक स्वरूप प्राप्त झाले आहे.
🟦 लवकरच भव्य स्मारक – किशोर डागवाले
स्मारक समितीचे किशोर डागवाले यांनी सांगितले की, सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम पूर्ण होईल. “हे स्मारक केवळ पुतळा नसून समाजप्रबोधनाचे केंद्र ठरेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
🟧 माळीवाडा वेस पाडणे गरजेचे
प्रा. माणिक विधाते यांनी सांगितले की, माळीवाडा वेस पूर्वी अहमदनगर शहराचे प्रवेशद्वार होते. मात्र सध्याच्या महानगराच्या वाढत्या स्वरूपात ही वेस जीर्ण झाली असून स्मारकासाठी अडथळा ठरत आहे. “भव्य स्मारकासाठी वेस पाडणे आवश्यक असून, नगरसेवकांचा मिळालेला पाठिंबा अभिमानास्पद आहे,” असे त्यांनी नमूद केले.

दरम्यान,
🟩 पुरातत्व विभागाच्या नियमांची अंमलबजावणी अत्यावश्यक : माळीवाडा वेस पाडून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले स्मारक उभारणीच्या मागणीदरम्यान, पुरातत्व विभागाच्या नियमांची अंमलबजावणी अत्यावश्यक ठरणार आहे. ऐतिहासिक किंवा वारसास्थळ म्हणून ओळख असलेल्या कोणत्याही वास्तूवर थेट कारवाई करण्यापूर्वी संबंधित विभागाची स्पष्ट परवानगी घेणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे.
🟩 पुरातत्व विभागाचे महत्त्वाचे नियम : ऐतिहासिक/वारसा दर्जा असलेल्या वास्तू पाडणे, बदल करणे किंवा स्थलांतर करण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक.
महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग किंवा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) यांची मंजुरी घेणे बंधनकारक.
संबंधित वास्तू संरक्षित (Protected Monument) असल्यास, कोणतीही कारवाई कायदेशीर गुन्हा ठरू शकते.
🟪 अतिक्रमणांवर कारवाईची मागणी
बजरंग भुतारे यांनी अतिक्रमणांबाबत नाराजी व्यक्त करत सांगितले की, वेशीभोवतीच्या अतिक्रमणांमुळे महात्मा फुले यांचा विद्यमान पुतळाही झाकला जात आहे. “काही नगरसेवक विरोध करत असले तरी नागरिकांचा मोठा पाठिंबा स्मारकासाठी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
🟫 स्मारकामुळे परिसराचा कायापालट
पंडित खरपुडे यांनी सांगितले की, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले हे सर्व समाजाचे दैवत असून त्यांचे स्मारक भव्य आणि सर्वदर्शनीय असावे. “माळीवाड्यातील पाचही रस्त्यांवरून स्मारक दिसेल, अशा पद्धतीने उभारणी झाल्यास परिसराचा कायापालट होईल,” असे त्यांनी नमूद केले.
या वेळी स्मारक समितीचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, गणेश मंडळांचे सदस्य तसेच महात्मा फुले प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळासाहेब भुजबळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.