शिवजयंती जल्लोषात : शेवगाव तालुका भगवामय

शेवगाव । २०.०२ । लक्ष्मण मडके । नगरी नगरी ( शिवजयंती ) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त…
1 Min Read 0 97

शेवगाव । २०.०२ । लक्ष्मण मडके । नगरी नगरी

( शिवजयंती ) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शेवगाव शहरासह संपूर्ण तालुका भगव्या रंगात न्हाऊन निघाला. प्रमुख चौक, शाळा, सार्वजनिक मंडळे आणि ग्रामीण भागात विविध सांस्कृतिक, क्रीडा व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

सकाळपासूनच अभिवादनासाठी गर्दी

( शिवजयंती ) सकाळी सात वाजल्यापासून क्रांती चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवप्रेमींची मोठी गर्दी झाली होती. कुटुंबासह नागरिकांनी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करत “जय भवानी, जय शिवाजी” आणि “जय जिजाऊ, जय शिवराय” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

भव्य मिरवणुका व पारंपरिक जल्लोष

( शिवजयंती ) शहरातील विविध भागांतून टाळ-मृदंग, झांज, ढोल पथक, दिंडी, लेझीम, पावल्या, फुगड्या अशा पारंपरिक वेशभूषेतील तरुणाईने शिवध्वज हाती घेत भव्य मिरवणुका काढल्या. शिवराज्याभिषेकाचे देखावे, मल्लखांब व रोप मल्लखांब प्रात्यक्षिकांनी नागरिकांचे लक्ष वेधले. मावळ्यांच्या वेशातील विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक प्रसंगांचे जिवंत चित्र साकारले.

मिरवणूक आंबेडकर चौक, क्रांती चौक, मेन पेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समारोपास पोहोचली. संपूर्ण शहर भगव्या पताकांनी सजले होते.

शाळांचा उत्स्फूर्त सहभाग

आबासाहेब काकडे विद्यालय व काकडे समूह, ज्ञानदीप विद्या मंदिर, बाळासाहेब भारदे हायस्कूल, रेसिडेन्सीअल हायस्कूल तसेच त्रिमूर्ती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी झांज पथक, ढोल पथक, लेझीम पथक व ऐतिहासिक वेशभूषेत सहभाग घेतला. शिक्षक, पालक व ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

सार्वजनिक उत्सव समितीचे उपक्रम

( शिवजयंती ) शेवगाव तालुका सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने “छत्रपती चषक” जंगी कुस्ती स्पर्धा, भव्य रक्तदान शिबिर, कबड्डी स्पर्धा तसेच प्रबोधनपर शिवव्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन युवकांनी राष्ट्रसेवा व सामाजिक बांधिलकी जोपासावी, असा संदेश यावेळी देण्यात आला.

ग्रामीण भागातही उत्साह

ठाकूर निमगाव, गदेवाडी, हातगाव, मुंगी, बोधेगाव, लाडजलगाव, बालमटाकळी, चापडगाव, वाघोली आदी गावांमध्ये रंगभरण स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, प्रश्नमंजुषा, सांस्कृतिक कार्यक्रम व शिवप्रतिमा पूजन यांसारखे विविध उपक्रम पार पडले.

यंदाच्या शिवजयंतीनिमित्त अबालवृद्धांमध्ये अपार उत्साह पाहायला मिळाला. भगवा फेटा, पारंपरिक पोशाख आणि हातात शिवध्वज घेतलेली तरुणाई सर्वांचे आकर्षण ठरली. शेवगाव शहरात शिवजयंतीच्या निमित्ताने ऐतिहासिक अभिमान, सांस्कृतिक ऐक्य आणि सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडले.

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media

Share this content