अहिल्यानगर | खासेराव साबळे | नगरी नगरी :
नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे श्री संत सावता माळी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने सामाजिक जबाबदारीचे भान राखत अमरधाम परिसरात दशक्रिया विधीसाठी प्रवचन मंडप उभारून एक आदर्श उपक्रम राबविला आहे. या मंडपासाठी संस्थेकडून सुमारे २ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना अंत्यविधीच्या वेळी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने उभारण्यात आलेला हा मंडप गावासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत असून संस्थेच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ही पतसंस्था केवळ आर्थिक व्यवहारापुरती मर्यादित न राहता सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य करत आहे. पिंपळगाव माळवी परिसरातील शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार आणि व्यावसायिकांसाठी ही संस्था मोठा आधार ठरली आहे. विद्यार्थ्यांसाठी मोफत वाचनालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होत आहे.
तसेच, दरवर्षी विविध परीक्षांमध्ये यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन दिले जाते. पावसाळ्यात खराब झालेल्या रस्त्यांवर मुरूम टाकून दुरुस्ती करण्याचे कामही संस्थेकडून करण्यात येते, ज्यामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
संस्थेचे संस्थापक प्रा. देवराम शिंदे यांनी सांगितले की, “पतसंस्थेच्या माध्यमातून नागरिकांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासोबतच त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करणे हे आमचे ध्येय आहे. आर्थिक विकासाबरोबर सामाजिक विकासही तितकाच महत्त्वाचा आहे.”
पतसंस्थेच्या या विविध उपक्रमांमुळे ती केवळ आर्थिक मदत करणारी संस्था न राहता समाजउभारणीचे प्रभावी केंद्र बनत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.