महाराष्ट्र ।१९.०२। नगरीनगरी :
(Shiv Jayanti ) महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३९६ वी जयंती राज्यभरात अभूतपूर्व उत्साहात साजरी होत आहे. गड-किल्ल्यांपासून शहरांपर्यंत ढोल-ताशांच्या गजरात, मिरवणुका आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण दणाणून गेले आहे.
(Shivneri) शिवनेरीवर जन्मोत्सवाचा सोहळा :
शिवनेरी किल्ला येथे काल रात्रीपासूनच शिवभक्तांची मोठी गर्दी उसळली होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी उपस्थित राहून अभिवादन केले. गडावर शिवरायांचा पाळणा जोजवत जन्मोत्सव सोहळा पार पडला.
शिवाई देवी मंदिर येथे शिवाई देवी व शिवरायांचा शासकीय अभिषेक जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या हस्ते संपन्न झाला. ढोल-ताशांच्या गजरात “जय भवानी, जय शिवाजी”चा निनाद घुमत होता.
(Tuljapur) तुळजाभवानीच्या चरणी शिवअभिषेक
धाराशिव येथील तुळजाभवानी मंदिर येथे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. तुळजाभवानी हे शिवरायांचे दैवत असल्याने सिंहासन पूजेनंतर शिवअभिषेक करण्यात आला. मंदिर परिसरात शिवभक्तांनी प्रदक्षिणा घालत जयघोष केला. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला.
(Solapur) सोलापुरात डीजेमुक्त शिवजयंतीचा आदर्श
सोलापुरातील मराठा वस्ती परिसरातील मंडळाने मागील सात वर्षांपासून डीजेमुक्त शिवजयंती साजरी करण्याचा संकल्प जपला आहे. डीजेवरील खर्च टाळून परिसरातील महिलांना मराठमोळी साडी-चोळी भेट देण्यात येते. या उपक्रमामुळे शिवरायांची संस्कारमूल्ये जपली जात असून मंडळाच्या संकल्पनेचे शहरभर कौतुक होत आहे.
(Fort) ४२२ किल्ल्यांपासून साकारले अद्वितीय चित्र

प्रा. डॉ. दिनेश गुप्ता आनंदश्री यांनी शिवरायांनी जिंकलेल्या ४२२ किल्ल्यांच्या नावांपासून शिवछत्रपतींचे एक भव्य आणि संशोधनाधिष्ठित चित्र साकारले आहे. गेल्या वर्षी शिवरायांशी संबंधित १२ ऐतिहासिक किल्ल्यांना ‘जागतिक वारसा’ दर्जा मिळाल्यानंतर त्यांनी हा संकल्प केला. सलग दोन दिवस परिश्रम घेऊन साकारलेले हे पोर्ट्रेट इतिहास, कला आणि अभ्यास यांचा अप्रतिम संगम ठरत आहे.
३९६ व्या शिवजयंतीनिमित्त राज्यभरात उत्साह, अभिमान आणि प्रेरणेचे वातावरण असून, शिवरायांचे विचार आणि कार्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार प्रत्येक शिवभक्त व्यक्त करत आहे. 🚩