शेवगाव | १४.२ | लक्ष्मण मडके
(Bank) शेतकरी आणि महिला बचतगटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शेवगाव शाखेच्या वतीने मार्गदर्शन व क्रेडिट आऊटरीच मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शेतकरी, महिला बचतगटांच्या प्रतिनिधींसह विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bank) कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी अंकुश जोगदंड यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती अधिक उत्पादक व किफायतशीर करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय व संतुलित शेतीकडे वळण्याचे आवाहन त्यांनी केले. उत्पादन खर्चात बचत करून शाश्वत शेतीला चालना देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
(Bank) पंचायत समितीचे फिरोज सय्यद यांनी बचतगटांना सक्षम करण्यासाठी बँकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. मेहनती बचतगटांना प्राधान्याने आर्थिक मदत देऊन प्रधानमंत्री विमा योजना व इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आल्यास गावांचा सर्वांगीण विकास शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्षेत्रीय प्रबंधक, छत्रपती संभाजीनगर येथील निकुंज गर्ग उपस्थित होते. त्यांनी सेंट्रल बँक ही भारतातील पहिली स्वदेशी बँक असल्याचा अभिमान व्यक्त केला. बचतगटांनी आर्थिक शिस्त पाळून आपला सिबिल स्कोअर चांगला ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. आजपर्यंत सेंट्रल बँकेच्या एकाही बचतगटाची थकबाकी नसल्याची अभिमानास्पद बाब त्यांनी नमूद केली.
यावेळी पात्र लाभार्थी शेतकरी व बचत गटांना विविध योजनांचा लाभ वितरित करण्यात आला. या मेळाव्यामुळे शेतकरी व महिला बचतगटांना आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल करण्यासाठी नवी प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमास मुख्य प्रबंधक चंदन कुमार, शेवगाव शाखा प्रमुख प्रदीप राऊत, बोधेगाव शाखा प्रमुख गणेश फरताळे, नेवासा शाखा प्रमुख दीपांकर मोहंती, सहायक मॅनेजर प्रसन्न दोतोनडे, अग्री फील्ड ऑफिसर राम शिंदे तसेच बचत गटातील महिला व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा मेळावा शेतकरी हिताचा ठरला असून ग्रामीण भागातील आर्थिक सक्षमीकरणासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला.