Blinkit । नागपूरमध्ये ब्लिंकिट स्टोअर सील; बिग बास्केटवर कारवाई; ‘ब्राउन ब्रेड’च्या चुकीच्या लेबलिंगवर FDA ची कडक कारवाई

नागपूर ।१६.०२। नगरी नगरी : (Blinkit) नागपूरमधील ऑनलाईन किराणा व्यावसायिकांकडून होत असलेल्या कथित नियमभंगांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई…
1 Min Read 0 144

नागपूर ।१६.०२। नगरी नगरी :

(Blinkit) नागपूरमधील ऑनलाईन किराणा व्यावसायिकांकडून होत असलेल्या कथित नियमभंगांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई अधिक तीव्र केली आहे. धरमपेठ येथील ब्लिंकिटचे स्टोअर सील करण्यात आले असून, सरोजनगरमधील बिग बास्केटच्या आऊटलेटवरही योग्य परवाना नसणे आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई सुरू करण्यात आली आहे.

(Blinkit) ही कारवाई ऑनलाईन डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवर कार्यरत असलेल्या अन्न व्यवसायांवर विशेष तपास मोहीम राबवून करण्यात आली. धरमपेठ येथील ब्लिंकिट स्टोअरकडे राज्य परवाना नसल्याचे आढळले. अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाने धरमपेठ येथील Blinkit Commerce Pvt. Ltd. च्या आस्थापनाची तपासणी केली.

(Blinkit)तपासणीदरम्यान संबंधित आऊटलेटकडे अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत अन्नपदार्थ विक्रीसाठी आवश्यक असलेला राज्य परवाना नसल्याचे आढळून आले. वैध परवान्याशिवाय अन्न व्यवसाय चालविणे हा गंभीर नियमभंग मानला जातो. त्यामुळे संबंधित स्टोअरचा व्यवसाय तत्काळ बंद करण्याचे आदेश देऊन आवश्यक परवाना मिळेपर्यंत आस्थापना सील करण्यात आली.

(Blinkit)‘ब्राउन ब्रेड’मध्ये ९० टक्के मैदा

तपासणीदरम्यान अजित बेकरी, नागपूर निर्मित ब्राउन ब्रेड संबंधित आऊटलेटमध्ये विक्रीस ठेवलेली आढळली. प्रयोगशाळेच्या निकषांनुसार ब्राउन ब्रेडमध्ये किमान ५० टक्के संपूर्ण गव्हाचे पीठ असणे आवश्यक आहे. मात्र प्राथमिक तपासणीत जप्त केलेल्या ब्रेडमध्ये फक्त १० टक्के गव्हाचे पीठ असून सुमारे ९० टक्के प्रमाणात मैदा असल्याचे निदर्शनास आले.

हे दिशाभूल करणारे लेबलिंग व ग्राहकांची फसवणूक असल्याचे नमूद करून FDA ने नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असून उर्वरित साठा जप्त केला आहे. मैद्यापासून बनविलेल्या ब्रेडला “ब्राउन ब्रेड” असे लेबल लावून विक्री करणे हे ग्राहकांची दिशाभूल करणारे असून अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

(Blinkit)बिग बास्केट आऊटलेटवरही कारवाई :

सरोजनगर येथील बिग बास्केटद्वारे चालविण्यात येणाऱ्या स्टोअरवरही तत्सम कारवाई करण्यात आली. परवाना नियमांचे पालन न करणे व इतर अनियमितता आढळल्याने आवश्यक दुरुस्तीपर्यंत संबंधित आऊटलेटला अन्न व्यवसाय सुरू ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे.

ही मोहीम संयुक्त आयुक्त (दक्षता, मुंबई) डॉ. राहुल खाडे आणि सहाय्यक आयुक्त यदुराज दहातोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. तपास पथकात अन्नसुरक्षा अधिकारी ललित सोयाम, रावसाहेब वाकडे, अमर सोंटक्के आणि वर्षा खरात यांचा समावेश होता.

अधिकाऱ्यांनी ग्राहकांना आवाहन केले आहे की, विशेषतः आरोग्यदायी पर्याय म्हणून विक्री होणाऱ्या अन्नपदार्थांचे लेबल काळजीपूर्वक वाचावे. योग्य परवाना नसताना व्यवसाय करणाऱ्या किंवा ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या कोणत्याही अन्न व्यवसायाविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media

Share this content