ऑनलाईन फसवणुक करणाऱ्या ‘मास्टरमाईंड’ला अटक : सोलापूर सायबर पोलिसांची मोठी कारवाई

सोलापूर | २१.२ | नगरी नगरी ऑनलाईन गुंतवणूक करायला लावून फसवणुक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा मुख्य सूत्रधार अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला…
1 Min Read 0 162

सोलापूर | २१.२ | नगरी नगरी

ऑनलाईन गुंतवणूक करायला लावून फसवणुक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा मुख्य सूत्रधार अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. सोलापूर शहर सायबर पोलीस स्टेशनने तीन वर्षांपासून फरार असलेल्या ग्लेन (अल्बर्ट) पर्सी सिक्वेरा (वय ४७, रा. पलावा सिटी, डोंबिवली) याला  अहमदाबाद येथील विमानतळावर अटक केली. सिक्वेरा याच्याविरुद्ध लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

( Fraud ) लाखांची ऑनलाईन फसवणूक

२०२४ मध्ये अंदाजे ६२ लाख ६५ हजार रुपयांची ऑनलाईन गुंतवणूक फसवणूक प्रकरण उघड झाले होते. सायबर पोलीस स्टेशन गुन्हा क्र. ०४/२०२४ अन्वये भादंवि कलम ४२०, ४१९, ३४ तसेच आयटी ॲक्ट ६६ (C) (D) अंतर्गत ४ जुलै २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

फिर्यादींना शेअर मार्केटमध्ये १० ते ३०० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून विविध बँक खात्यांमध्ये व डिजिटल करन्सी (USDT) वॉलेटद्वारे पैसे वळवण्यात आले.

तपासात अल हरिमहजीज उमराह सर्व्हिसेस या खात्यात १६.६० लाख रुपये, तर ब्लॅकसिड सोल्यूशन्स ॲण्ड सर्व्हिस या खात्यात १०.३९ लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. ही रक्कम डिजिटल करन्सीद्वारे परदेशात पाठवण्यात आली होती.

( Fraud ) लाओसमध्ये ‘टिचर’सोबत संगनमत

मुख्य आरोपी सिक्वेरा २०२२ पासून लाओस येथे वास्तव्यास होता. तेथे ‘टिचर’ या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या चिनी फसवणूकदारासोबत संगनमत करून विविध देशांतील युवकांना नोकरीचे आमिष दाखवून परदेशात बोलावले जात होते. परदेशात पोहोचल्यानंतर त्यांचे पासपोर्ट जप्त करून जबरदस्तीने ऑनलाईन फसवणूक करवून घेतली जात असल्याची धक्कादायक बाब तपासात उघड झाली.

( Fraud ) ९२ तक्रारींची नोंद

मुंब्रा-ठाणे येथील सहआरोपी तन्वीर याकुब चौगुले यांच्या वापरलेल्या खात्यांवरून महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, नागपूर, चंद्रपूर, नंदुरबार तसेच इतर राज्यांतून एकूण ९२ ऑनलाईन तक्रारी दाखल झाल्या आहेत. तामिळनाडूतील Pudhukottai CB CID येथेही आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल असून तो परांगदा म्हणून नोंद आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

नागरिकांना आवाहन :

सायबर पोलिसांनी नागरिकांना सावधगिरीचा इशारा देत जादा नफ्याचे आमिष दाखवणाऱ्या ऑनलाईन जाहिरातींना बळी पडू नये, अनोळखी व्यक्तींना बँक खाते, एटीएम कार्ड, सिमकार्ड, ओटीपी किंवा वैयक्तिक माहिती देऊ नये, असे आवाहन केले आहे. कमिशनच्या आमिषाने खाते उघडण्यास सांगितल्यास तत्काळ सायबर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, अन्यथा नकळत आपणही गुन्ह्यात अडकू शकता, असा इशाराही देण्यात आला आहे.

सोलापूर सायबर पोलिसांच्या या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटला मोठा धक्का बसला आहे.

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media