अहिल्यानगर । २१.०२ । अमोल भांबरकर :
(Social) क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीसाठी सकल माळी समाज एकवटला आहे. माळीवाडा येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य स्मारकाच्या कामाला गती द्यावी व येणारे अडथळे दूर करावेत, अशी ठाम भूमिका समाजाने घेतली आहे.
(Social) या स्मारकाचे भूमिपूजन तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या हस्ते झाले होते. आमदार संग्राम जगताप यांनी स्मारकासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिल्याने शहराच्या वैभवात भर घालणारे भव्य स्मारक उभारले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
(Social) अतिक्रमणे हटवण्याची मागणी
स्मारक अत्यंत देखणे व भव्यदिव्य व्हावे यासाठी माळीवाडा परिसरातील काही अतिक्रमणे हटविण्याची मागणी सकल माळी समाजाने केली आहे. स्मारकाच्या उभारणीतील अडथळे दूर करण्यासाठी आवश्यक असल्यास आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही देण्यात आला.
सकल माळी समाजाचे उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ म्हणाले, “फुले दांपत्यांनी सर्व समाजासाठी शिक्षणाची व ज्ञानाची दारे खुली केली. ते केवळ माळी समाजाचे नव्हे तर संपूर्ण समाजाचे दैवत आहेत.”
(Social) तातडीची बैठक
रंगारगल्ली येथील एस.टी. महाले मंगल कार्यालय येथे सकल माळी समाजाच्या वतीने अध्यक्ष किशोर डागवाले यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक पार पडली. यावेळी समाजातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्मारक उभारणी लवकर पूर्ण करण्याचा ठराव केला.
किशोर डागवाले म्हणाले, “महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा लवकर उभारण्यात यावा, ही सर्व समाजाची भावना आहे. स्मारक उभारणीसाठी येणारे अडथळे दूर करण्यासाठी शिष्टमंडळ विविध नेत्यांच्या भेटी घेणार आहे.”
(Social) शहराच्या वैभवात भर
श्री विशाल गणपती देवस्थानचे विश्वस्त पंडितराव खरपुडे यांनी सांगितले की, माळीवाडा चौकातून श्री विशाल गणपती मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, वाडिया पार्क व जिल्हा परिषद अशा पाच प्रमुख रस्त्यांवरून हे स्मारक दिसावे, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडेल.
बैठकीत संजय गारुडकर, दीपक खेडकर, डॉ. दामोदर कळमकर, अर्जुन बोरुडे, डॉ. रणजीत सत्रे, जालिंदर बोरुडे आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक राजेंद्र पडोळे यांनी तर आभार विनोद पुंड यांनी मानले.
फुले दांपत्यांच्या कार्याची गाथा सांगणारे हे स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी सकल माळी समाजाने एकजूट दाखवली असून शहरात सामाजिक ऐक्याचा संदेश दिला आहे.