(Shani Shingnapur) सोनई/शनिशिंगणापूर । विजय खंडागळे । नगरी नगरी :
श्री क्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थान प्रशासनातील वेतन प्रश्न चिघळला असून कामगार संघटनेच्या वतीने २ मार्चपासून साखळी उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. डिसेंबर २०२५ व जानेवारी २०२६ या दोन महिन्यांचे थकीत वेतन तसेच दिवाळी बोनस न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
(Shani Shingnapur) कामगार संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वारंवार निवेदन देऊनही प्रश्न मार्गी न लागल्याने संघटनेने आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. प्रोव्हिडंट फंड, आयुर्विमा, कामगार सोसायटी कर्ज कपात आदी रकमांवर व्याजाचा भुर्दंड बसत असून आर्थिक ताण वाढल्याने कर्मचारी बेचैन झाले आहेत.
कर्मचाऱ्यांनी देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांना निवेदन देत तातडीने प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे. मात्र समाधानकारक तोडगा न निघाल्याने २ मार्चपासून साखळी उपोषण करण्यात येणार आहे. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी कामकाज सुरू ठेवण्यात येईल; मात्र संघटनेतील पाच कर्मचारी बेमुदत उपोषणास बसणार असून इतर कर्मचारीही टप्प्याटप्प्याने सहभागी होणार आहेत.
(Shani Shingnapur) या संदर्भातील निवेदनाच्या प्रती संबंधित पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, धर्मादाय आयुक्त (नाशिक), सहाय्यक धर्मादाय आयुक्त तसेच कामगार आयुक्त यांना माहितीस्तव पाठविण्यात आल्या आहेत. देवस्थान प्रशासन व कर्मचारी संघटना यांच्यातील वादामुळे परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.