सॅमसनची संयमित फटकेबाजी ! भारत सेमीफायनलमध्ये

कोलकता । ०२.०३ । नगरी नगरी : (T20) आयसीसी टी ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेतील अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर ५…
1 Min Read 0 97

कोलकता । ०२.०३ । नगरी नगरी :

(T20) आयसीसी टी ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेतील अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर ५ गडी राखून विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली. १९६ धावांच्या अवघड लक्ष्याचा पाठलाग करताना संजू सॅमसनने नाबाद ९७ धावांची अप्रतिम खेळी साकारत भारताला चार चेंडू राखून विजय मिळवून दिला. हा सामना म्हणजे सॅमसनच्या कारकिर्दीतील सुवर्णक्षण ठरला.

टॉस, रणनीती आणि सुरुवात

(T20) भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेविरुद्धच्या दमदार विजयामुळे संघात कोणताही बदल करण्यात आला नाही.

डावाच्या पहिल्याच षटकात अर्शदीप सिंग याने अचूक मारा करत वेस्ट इंडिजला सावध सुरुवात करायला भाग पाडले. मात्र दुसऱ्या षटकात हार्दिक पांडयाच्या गोलंदाजीवर शाई होप याने षटकार-चौकार ठोकत डावाला गती दिली.

वेस्ट इंडिजची भक्कम उभारणी

(T20) वेस्ट इंडिजने सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेत २० षटकांत ४ बाद १९५ अशी स्पर्धात्मक धावसंख्या उभी केली. कर्णधार शाई होपने संयमी आणि जबाबदारीची खेळी करत डाव सावरला. मधल्या फळीत फलंदाजांनी योग्य वेळी फटकेबाजी केली.

भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या षटकांत धावगती आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु १९५ धावा म्हणजे मोठे आव्हान होते.

भारताचा पाठलाग – ताण, धडधड आणि संयम

(T20) १९६ धावांचे लक्ष्य गाठताना भारताची सुरुवात स्थिर झाली. सॅमसनला पुन्हा एकदा सलामीची जबाबदारी देण्यात आली. अभिषेक शर्मा लवकर बाद झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये काही काळ शांतता पसरली. त्यानंतर काही धावांची भर घालत सूर्यकुमार यादवही पॅव्हेलिअनमध्ये परतला. महत्त्वाच्या विकेट्स पडल्याने दडपण वाढले. त्या वेळी सॅमसनने एका बाजूने धावफलक राहिल याची काळजी घेतली.

त्याने सुरुवातीला संयमाने खेळ करत नंतर आवश्यक त्या क्षणी मोठे फटके खेळले. शिवम दुबेने काही महत्त्वाचे चौकार ठोकत शेवटच्या टप्प्यात ताण कमी केला.

अखेरच्या षटकात भारताला ७ धावांची गरज होती. सॅमसनने पहिल्याच चेंडूवर ८० मीटरचा षटकार ठोकून सामना बरोबरीत आणला आणि पुढच्याच चेंडूवर चौकार मारत विजय निश्चित केला.

‘प्लेअर ऑफ द मॅच’ – संयमाचे फळ

नाबाद ९७ धावांची खेळी करत सॅमसन सामनावीर ठरला. भावुक होत तो म्हणाला,

“देशासाठी खेळण्याचे स्वप्न पाहिल्यापासून मी याच क्षणाची वाट पाहत होतो. विराट आणि रोहितसारख्या महान खेळाडूंकडून डगआउटमध्ये बसून खूप काही शिकलो. आज त्याचा उपयोग झाला.”

त्याने आपल्या यशाचे श्रेय विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या मार्गदर्शनाला दिले.

कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला,

“चांगल्या लोकांच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतात. सॅमसनच्या संयम आणि मेहनतीचे फळ योग्य वेळी मिळाले.”

वेस्ट इंडिजची खंत

(T20) शाई होप म्हणाला,

“काही निर्णायक क्षणी आम्ही कमी पडलो. अजून थोडे जास्त प्रयत्न केले असते तर आम्ही अंतिम फेरीच्या उंबरठ्यावर पोहोचलो असतो. पण भारताने दबावाखाली असूनही उत्कृष्ट खेळ केला. आम्हाला आणखी काही धावा करण्याची गरज होती. जसप्रीत बुमराहने 12 व्या ओव्हरमध्ये दोन विकेट घेतल्या यांची महत्त्वाची पार्टनरशिप तोडली. आमच्यासाठी यंदा हेटमायर चांगली कामगिरी करत होता. जर आजही तो चांगला खेळला असता तर एक मोठा स्कोअर नक्कीच झाला असता, बुमराह त्यांचा स्ट्राईक बॉलर आहे. त्यामुळे ज्यावेळी त्याच्याकडे चेंडू असतो तेव्हा काहीतरी होणार हे निश्चित असतं, असं शाई होप म्हणाला.”

हा विजय केवळ उपांत्य फेरीचे तिकीट नव्हते, तर संजू सॅमसनच्या दीर्घ प्रतीक्षेचा आणि जिद्दीचा परिपाक होता. ५ मार्चला भारताची गाठ इंग्लंडशी पडणार आहे .

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media