फलंदाजांची दिवाळी ; गोलंदाजांवर संक्रांत : भारताचा इंग्लंडवर ७ धावांनी रोमहर्षक विजय.भारत चौथ्यांदा अंतिम फेरीत

(Cricket) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या अत्यंत थरारक सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर ७ धावांनी विजय मिळवत टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश…
1 Min Read 0 168

(Cricket) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या अत्यंत थरारक सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर ७ धावांनी विजय मिळवत टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. धावांचा पाऊस पडलेल्या या उपांत्य सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ७ बाद २५३ धावांचा डोंगर उभा केला. इंग्लंडने २४७ धावा केल्या. या विजयामुळे भारताचा अंतिम सामना न्यूझीलंडविरुद्ध रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

🔥 सॅमसनची धडाकेबाज खेळी

(Cricket) भारतीय डावाची सुरुवात आक्रमक झाली. अभिषेक शर्मा पुन्हा एकदा लवकर बाद झाला. मात्र त्याचे कुठलेही दडपण न घेता संजू सॅमसनने इंग्लिश गोलंदाजांवर तुफानी हल्ला चढवत ४२ चेंडूत ८९ धावा केल्या. त्यामध्ये ८ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता . सॅमसनने केवळ २६ चेंडूत अर्धशतक पूर्ण करत भारतीय डावाला वेग दिला. त्याची ही खेळी टी-20 विश्वचषकाच्या नॉकआउट सामन्यातील भारतीय फलंदाजाची सर्वोच्च धावसंख्या ठरली असून ती २०१६ मध्ये विराट कोहलीने केलेल्या ८९ धावांच्या बरोबरीची आहे. या सामन्यातही सॅमसन प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरला.

किशन-सॅमसनची दमदार भागीदारी

सॅमसनला इशान किशनने उत्तम साथ दिली. त्याने १८ चेंडूत ३९ धावा केल्या. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ९७ धावांची झपाट्याने भागीदारी करत इंग्लंडवर दबाव आणला.

💥 मधल्या फळीचा तडाखा

(Cricket) मधल्या फळीतही भारतीय फलंदाजांनी वेग कायम ठेवला. शिवम दुबे याने इंग्लिश स्पिनर्सचा समाचार घेत २५ चेंडूत ४३ धावा केल्या. हार्दिक पांड्याने १२ चेंडूत २७ धावा, तर तिलक वर्माने ७ चेंडूत २१ धावा कुटल्या.

या धडाकेबाज फटक्यांमुळे भारताने २५३ धावांचा भक्कम स्कोर उभारला. इंग्लंडकडून विल जॅक्सने सर्वाधिक प्रभावी गोलंदाजी करत दोन गडी बाद केले .

💪 जेकब बेथेलचे शतक, तरी इंग्लंड पराभूत :

२५४ धावांच्या अवघड लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडनेही जोरदार लढत दिली. जेकब बेथेलने स्फोटक फलंदाजी करताना ४८ चेंडूतच १०५ धावा केल्या . त्याने चौकार-षटकारांचा पाऊस पाडत इंग्लंडला विजयाच्या जवळ नेले. त्याला विल जॅक्सने २०चेंडूत ३५ धावा करत चांगली साथ दिली.

🎯 बुमराहची किफायतशीर गोलंदाजी आणि भारताचा विजय

महत्त्वाच्या क्षणी भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत सामना भारताच्या बाजूने वळवला. जसप्रीत बुमराहने ४ षटकांत ३३ धावा देत एक गडी बाद केला . हार्दिक पांड्याने ३८ धावात दोन गडी बाद केले. अक्षर पटेलने मोक्याच्या क्षणी दोन अवघड झेल घेत महत्त्वाची भूमिका बजावली. शेवटच्या दोन षटकांत इंग्लंडला ३९ धावा हव्या असताना भारताने दडपण कायम ठेवत विजय मिळवला. शेवटचे षटक शिवम दुबेला देऊन कर्णधार सूर्यकुमारने इंग्लिश फलंदाजांना चकित केले. कारण संपूर्ण सामन्यात दुबेला एकही षटक दिले गेले नव्हते . या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर दुहेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात बेथेल धावबाद झाला आणि भारतावरचं पराजयाचं संकट खऱ्या अर्थाने दूर झालं . त्यानंतर दुबेला आर्चरने तीन षटकार खेचले. पण तरीही विजयासाठी इंग्लंडला ७ धावा कमी पडल्या आणि त्यांचा डाव २० षटकांत २४६ धावांवर थांबला. अंतिम फेरी मार्चला अहमदाबाद येथे होणार असून भारताची गाठ न्युझिलंड संघाशी पडणार आहे.

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media