अहिल्यानगर | प्रतिनिधी | नगरी नगरी :
देशात एलपीजी गॅसचा कोणताही तुटवडा नसताना, कृत्रिम कमतरता निर्माण करून गैरप्रकार करणाऱ्या गॅस एजन्सींच्या ‘ सिलिंडर मॅनेजमेंट ‘ चा मोठा भांडाफोड होण्याची शक्यता आहे. गॅस रिफिल बुकिंगसाठी सरकारने लागू केलेल्या २५ दिवसांच्या वेळमर्यादेमुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेला ‘काळा खेळ’ उजेडात येत आहे. अर्थात, यासंदर्भात अधिकृत तक्रार दाखल न झाल्याने अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई झाल्याचे निदर्शनास आले नाही.
सरकारने गॅसचा पुरवठा सुयोग्य पद्धतीने व्यवस्थापित करण्यासाठी हा नियम लागू केला होता. मात्र, या निर्णयानंतर देशभरातील अनेक ठिकाणी ग्राहकांना “Already Booked” असा संदेश येऊ लागला.
अहिल्यानगर जिल्हयातील भैरवनाथ वाकळे यांना असा अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, वाकळे यांनी महिनाभरात सिलिंडर घेतलेला नसतानाही त्यांच्या नावावर बुकिंग झाल्याचे दिसून आले.
🔍 काय आहे नेमका प्रकार?
गॅसच्या कृत्रिम टंचाईमध्ये ग्राहक जेव्हा आपले सिलिंडर बुक करु लागले तेव्हा काही ग्राहकांच्या नावावर त्यांच्या परवानगीशिवाय गॅस बुक झाल्याचे ग्राहकांच्या निदर्शनास आले. पूर्वी कोणतीही वेळमर्यादा नसल्यामुळे ग्राहकांना हा गैरप्रकार लक्षात येत नव्हता. मात्र आता २५ दिवसांचा नियम लागू होताच, हा प्रकार समोर आला आहे. अर्थातच ग्राहकाने सिलिंडर घेतला नसताना त्याच्या नावावर बुक झालेला किंवा डिलिव्हर झालेला सिलिंडर नेमका कुठे गेला ? हा प्रश्न अनुत्तरित आहे.
यासंदर्भात ग्राहकांकडून एजन्सीला विचारणा करण्यात आलीच तर अशा ‘जागरुक’ गॅसधारकाला तातडीने बिनबोभाट सिलिंडर पोहोच करण्यात येतात आणि आपली गरज भागली म्हणून ग्राहकही पुढे तक्रार करण्याच्या फंदात पडत नाही.
😟 ग्राहक हैराण, गॅस वितरकांमध्ये गोंधळ
या प्रकारामुळे अनेक ग्राहक गॅस एजन्सीजबाहेर रांगा लावत असून, बुकिंग नाकारले जात असल्याने ग्राहकांची नाराजी वाढली आहे. दुसरीकडे, काही ठिकाणी एजन्सी मालकांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
📢 जागरूक रहा, आवाज उठवा
जर तुमच्या नावावरही परवानगीशिवाय गॅस बुकिंग झाले असेल, तर त्वरित तक्रार नोंदवा. ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी सजग राहणे आवश्यक आहे.
📞 तक्रार करण्यासाठी महत्त्वाचे क्रमांक
MOPNG LPG हेल्पलाइन: 1906
भारत गॅस: 1800-22-4344
इंडेन: 1800-233-3555
एचपी गॅस: 1800-233-3555
राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन: 1800-11-4000 / 1915