अहिल्यानगरच्या राजेंद्र खिलारी यांचा दिल्लीत राष्ट्रीय ‘आजीवन कार्यगौरव’ सन्मान

अहिल्यानगर । प्रतिनिधी । नगरी नगरी : अहिल्यानगरचे सुपुत्र आणि सध्या मुंबई उच्च न्यायालयात अधिकारी म्हणून कार्यरत असलेले राजेंद्र एकनाथ…
1 Min Read 0 42

अहिल्यानगर । प्रतिनिधी । नगरी नगरी :

अहिल्यानगरचे सुपुत्र आणि सध्या मुंबई उच्च न्यायालयात अधिकारी म्हणून कार्यरत असलेले राजेंद्र एकनाथ खिलारी यांना त्यांच्या उल्लेखनीय शासकीय सेवेसह शैक्षणिक योगदानाबद्दल राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा ‘शासकीय विधी प्रशासन क्षेत्रातील आजीवन विशेष कार्यगौरव (वरिष्ठ)’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. राजधानी नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार २०२६ समारंभात हा मानाचा सन्मान प्रदान करण्यात आला.

या भव्य सोहळ्यात चाड प्रजासत्ताकाचे राजदूत एच. ई. म्मे इल्दजीमा बड्डा मल्लोट, टोगो प्रजासत्ताकाचे राजदूत एच. ई. यानो एडेम एकपेमडो, तसेच १९८३ विश्वचषक विजेते माजी भारतीय क्रिकेटपटू मदनलाल यांच्या हस्ते खिलारी यांना पुरस्कार देण्यात आला. राष्ट्रीय पातळीवर झालेल्या या गौरवामुळे अहिल्यानगरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

राजेंद्र खिलारी यांनी आपल्या शैक्षणिक जिद्दीच्या बळावर एकूण नऊ पदव्या आणि पदव्युत्तर पदव्या संपादन करत ज्ञानक्षेत्रात वेगळा ठसा उमटवला आहे. शासकीय जबाबदाऱ्या सांभाळताना शिक्षणाची अखंड ओढ जपणाऱ्या खिलारी यांनी केवळ प्रशासकीय क्षेत्रातच नव्हे, तर सहकाऱ्यांच्या आरोग्य आणि कल्याणासाठीही विशेष कार्य केले आहे. मुंबई उच्च न्यायालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्यविषयक उपक्रमांत त्यांनी घेतलेला पुढाकार विशेष कौतुकास्पद मानला जातो.

त्यांच्या निष्ठा, प्रामाणिकपणा आणि सातत्यपूर्ण सेवेमुळे न्यायव्यवस्थेचा सन्मान अधिक उंचावला असल्याची भावना या समारंभात व्यक्त करण्यात आली. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या राजेंद्र खिलारी यांनी संगमनेर तालुक्यातील कनोली गावातून शिक्षणाचा खडतर प्रवास सुरू केला आणि आज राष्ट्रीय सन्मानापर्यंत मजल मारत अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत.

त्यांचे वडील, लक्ष्मीनगर सोसायटीचे माजी अध्यक्ष एकनाथ खिलारी, यांनी दिलेल्या संस्कारांमुळेच हा प्रवास शक्य झाल्याची भावना त्यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केली. एका साध्या कुटुंबातून उच्च पदापर्यंत पोहोचून देशाच्या राजधानीत सन्मान मिळवणाऱ्या राजेंद्र खिलारी यांचे यश युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल आमदार संग्राम जगताप , मुंबई उच्च न्यायालय कर्मचारी संघटना, ऑल इंडिया हायकोर्ट कर्मचारी महासंघ, नगर जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना, लक्ष्मीनगर गृहनिर्माण संस्था, न्यू आर्ट्स कॉलेजमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, तसेच विविध सामाजिक संस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

अहिल्यानगरमधील मित्रपरिवारानेही राजेंद्र खिलारी यांच्या या यशाचा आनंद साजरा करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

राजेंद्र खिलारी यांचा हा सन्मान केवळ वैयक्तिक यश नसून अहिल्यानगरच्या भूमीतील जिद्द, शिक्षणनिष्ठा आणि सेवाभावाचा राष्ट्रीय स्तरावर झालेला गौरव मानला जात आहे.

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media