अहिल्यानगर । १२.०२ । नगरी नगरी :
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अहिल्यानगर येथील विद्यार्थी शुभम अरुण हंबीरराव (एम.एस.डब्ल्यू.०२) यांची नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत निवड झाल्याने जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
साध्या परिस्थितीतून पुढे आलेल्या शुभमने आपल्या अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर हे यश संपादन केले आहे. बालपणापासूनच खेळाबद्दल प्रचंड आवड असलेल्या शुभमने सातत्याने सराव करत आपली क्षमता सिद्ध केली. त्यामुळेच त्याची निवड थेट आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी झाली असून त्याच्या कुटुंबियांचे आणि मार्गदर्शकांचे स्वप्न साकार झाले आहे.
शुभमच्या या यशामागे वसतिगृहाचे गृहपाल श्री. एस. एस. इंगळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी वेळोवेळी विद्यार्थ्याला प्रोत्साहन देत खेळासाठी आवश्यक असलेले साहित्य उपलब्ध करून दिले. विद्यार्थ्यांच्या परिस्थितीची जाणीव ठेवत त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे शुभमला अधिक जोमाने सराव करण्याची संधी मिळाली.
विद्यार्थ्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त श्री. प्रविण कोरगंटिवार यांनी त्याचे विशेष कौतुक केले आहे. तसेच वसतिगृहातील इतर विद्यार्थ्यांनीही प्रेरणा घेऊन भविष्यात अशाच प्रकारे इतिहास घडवावा आणि पुढील पिढ्यांसाठी आदर्श निर्माण करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शुभम हंबीररावच्या या यशामुळे अहिल्यानगर जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा मंचावर झळकण्याची संधी मिळाली असून त्याच्या पुढील स्पर्धांसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.