अहिल्यानगर । श्रीनिवास बुरगुल । नगरी नगरी :
(Social) संत निरंकारी मिशनच्या सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या पुढाकाराने ‘प्रोजेक्ट अमृत’ या महाअभियानाचा चौथा टप्पा देशभरात उत्साहात राबविण्यात आला. दिल्लीतील बुराडी रोडवरील भव्य मैदानावर आयोजित विशेष सत्संग कार्यक्रमात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या उपस्थितीत या अभियानाचा शुभारंभ झाला.
यावेळी सद्गुरु माता सुदीक्षाजींनी आपल्या प्रवचनातून सांगितले की, बाबा हरदेवसिंहजी महाराज यांचे संपूर्ण आयुष्य मानवकल्याणासाठी समर्पित होते. त्यांच्या शिकवणी केवळ स्मरणासाठी नसून त्या जीवनात आचरणात आणणे आवश्यक आहे.
(Social) ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’चा संदेश
‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या संकल्पनेवर आधारित या अभियानात देशातील २५ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ९३० शहरांमध्ये १६०० हून अधिक ठिकाणी जलस्वच्छता उपक्रम राबविण्यात आले. सुमारे १२ लाख स्वयंसेवकांनी यात सक्रिय सहभाग नोंदविला.
पाणी हे जीवनाचा आधार असून ईश्वराची अमूल्य देणगी आहे. त्याचे संवर्धन व संरक्षण करणे हे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य असल्याची जनजागृती या उपक्रमातून करण्यात आली.
(Social) कापूरवाडी तलाव परिसरात स्वच्छता मोहीम
या उपक्रमा विषयी अधिक माहिती देतांना निरंकारी मिशनचे अहिल्यानगर क्षेत्र ३६ अ विभाग प्रमुख हरिष खुबचंदानी यांनी सांगितले की, निरंकारी मिशनच्या नगर शाखेच्यावतीने बुर्हाणनगर जवळील कापूरवाडी तलाव व परिसरात सकाळी जलस्वच्छता अभियान राबविण्यात आले व परिसरातून मोठ्या प्रमाणात कचरा गोळा करून बुर्हाणनगर ग्रामपंचायतच्या कचरा गाडी द्वारे विल्हेवाट लावण्यात आली व परिसर स्वच्छ करण्यात आला,या मोहिमेत मोठ्या संख्येने निरंकारी सेवादल सदस्य, सेवादल अधिकारी व अनुयायी सहभागी झाले होते. सदर मोहिमेस अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट देवुन मिशनच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.
संत निरंकारी मिशन वेळोवेळी समाजोपयोगी व पर्यावरणपूरक उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदवत आहे. ‘वननेस वन’ अभियानांतर्गत वृक्षारोपण तसेच ‘प्रोजेक्ट अमृत’च्या माध्यमातून जलसंवर्धनाचे प्रयत्न मानव आणि निसर्ग यांच्यात सुसंवाद प्रस्थापित करणारे प्रभावी पाऊल ठरत आहेत.