मुंबई | ७.०२ । नगरी नगरी :
मुंबईतील बोरीवली परिसरात इतिहास, निसर्ग आणि सांस्कृतिक वारशाचा अनोखा संगम पाहायला मिळतो. पर्यटन आणि ऐतिहासिक स्थळांचा शोध घेण्याची आवड असलेल्या लोकांसाठी बोरीवली परिसरात तीन दिवसांची ‘हेरिटेज वॉक’ शैलीतील खास पर्यटन योजना तयार करण्यात आली आहे. ही संपूर्ण योजना बोरीवली रेल्वे स्थानकाला केंद्रबिंदू मानून आखण्यात आली असून पर्यटकांना परिसरातील अनेक महत्त्वाची ठिकाणे पाहण्याची संधी मिळते. ही माहिती पर्यटनप्रेमी समीर परांजपे यांनी दिली आहे.
पहिला दिवस : कान्हेरी लेणी व संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
या सहलीची सुरुवात सकाळी साडेसात वाजता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून करता येते. उद्यानात प्रवेश केल्यानंतर सुमारे १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या ऐतिहासिक कान्हेरी लेणींना भेट देता येते. या प्राचीन लेणींचा इतिहास समृद्ध असून त्यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी किमान तीन तासांचा वेळ आवश्यक असतो.
लेणी पाहून झाल्यानंतर तेथील कँटीनमध्ये अल्पोपहार घेता येतो. त्यानंतर महत्मा गांधी छत्री असलेल्या टेकडीवरून संपूर्ण अभयारण्याचे सुंदर दृश्य पाहण्याचा आनंद घेता येतो. उद्यानात जैन मठातील सुमारे ६० फूट उंच संगमरवरी तीर्थंकरांच्या मूर्ती पाहण्यासारख्या आहेत. तसेच लायन आणि टायगर सफारीचा अनुभवही पर्यटकांना घेता येतो. संध्याकाळी साधारण ५ वाजेपर्यंत पहिल्या दिवसाची सफर पूर्ण होते.
दुसरा दिवस : मंडपेश्वर लेणी व कोरा केंद्र
दुसऱ्या दिवशी सकाळी बोरीवली पश्चिमेकडील मंडपेश्वर लेणींना भेट देता येते. या भव्य लेणी पाहण्यासाठी सुमारे एक तास पुरेसा ठरतो.
यानंतर शिंपोली रोडवरील कोरा केंद्र येथे जाता येते. येथे महात्मा गांधींच्या जीवनावर आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासावर आधारित दोन मोठी प्रदर्शनं पाहायला मिळतात. तसेच गांधीजी काही काळ वास्तव्यास असलेले ‘गांधी हाऊस’ देखील येथे पाहता येते. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाची उत्पादने येथे विक्रीसाठी उपलब्ध असतात.
दुपारी जवळील रेस्टॉरंटमध्ये भोजन करता येते. त्यानंतर कोरा ग्रामोद्योग केंद्र परिसरात फिरता येते. सुमारे सहा एकर परिसरात वसलेले हे केंद्र प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध आहे.
यानंतर जवळच असलेल्या वझिरा नाका स्वयंभू गणपती मंदिराला भेट देता येते. पुढे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित सार्वजनिक उद्यान देखील पाहण्यासारखे आहे. येथे भारतीय संसद भवनाची प्रतिकृती आणि विशेष ऑडिओ-व्हिज्युअल सादरीकरण पर्यटकांचे आकर्षण ठरते. संध्याकाळी साधारण ६ वाजता दुसऱ्या दिवसाची सफर पूर्ण होते.
तिसरा दिवस : ग्लोबल विपश्यना पॅगोडा व गोराई बीच
तिसऱ्या दिवशी सकाळी बोरीवली स्थानकातून गोराई जेट्टीकडे बस किंवा रिक्षाने जाता येते. तेथून समुद्रमार्गे ग्लोबल विपश्यना पॅगोडा आणि प्रसिद्ध मनोरंजन उद्यान एस्सेलवर्ल्ड येथे जाता येते. बोटीने हा प्रवास सुमारे पाच मिनिटांचा असतो.
भव्य वास्तू असलेल्या विपश्यना पॅगोडाचे दर्शन घेण्यासाठी सुमारे दोन तास लागतात. त्यानंतर इच्छेनुसार एस्सेलवर्ल्डमध्ये काही तासांचा मनोरंजनाचा आनंद घेता येतो.
संध्याकाळी गोराई बीचवर सूर्यास्ताचा सुंदर नजारा अनुभवत समुद्रकिनारी फेरफटका मारता येतो. त्यानंतर बोटीद्वारे परत गोराई जेट्टीवर येऊन बस किंवा रिक्षाने बोरीवली स्थानक गाठता येते.
पर्यटनासाठी उत्तम पर्याय
इतिहास, निसर्ग, अध्यात्म आणि मनोरंजन यांचा संगम असलेली ही तीन दिवसांची बोरीवली हेरिटेज वॉक पर्यटकांसाठी एक वेगळा अनुभव देणारी ठरू शकते. बोरीवली परिसरात पाहण्यासारखी अनेक ठिकाणे असल्याने पर्यटनप्रेमींनी हा अनुभव नक्की घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.