घटना १ :
पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे अध्यात्म आणि संस्काराचे धडे देणाऱ्या वारकरी संप्रदायाला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ महाराज याने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर मागील पाच वर्षांपासून धाक दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून पीडितेच्या तक्रारीनंतर पारनेर पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली आहे.
घटना २ : (जुनी घटना)
उत्तर प्रदेशातील रामपूर येथे राहणारा मौलवी यासीन हा एका मुलीला धार्मिक शिक्षण देत होता. या १४ वर्षीय मुलीवर मौलवीने लैंगिक अत्याचार केला होता. जेव्हा पीडितेनं याबाबतची माहिती तिच्या कुटुंबाला सांगितली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती. मौलवीच्या सहकाऱ्यांनी तिला अनेकदा धमकावले देखील होते. पण तिला शांत राहण्याऐवजी कोणताही पर्याय नव्हता.
आरोपीला अटक?
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत आरोपी मौलवी यासीन, त्याचा चुलत भाऊ शकील, पुतण्या आणि आठ जणांविरोधात एफआरआय दाखल केला आहे. पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली मौलवी यासीनच्या मुसक्या आवळल्या आहे.
घटना ३ : (जुनी घटना)
नवी मुंबईतील सीवूडमध्ये असलेल्या बेथेल गस्पेल चॅरिटेबल ट्रस्टच्या चर्चमधील आणखी तीन मुलींवर लैगिक अत्याचार झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या चर्चमध्ये असलेल्या अनधिकृत आश्रम शाळेवर महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिन्याभरापूर्वी धाड टाकत तेथून ४५ मुलामुलींची सुटका केली होती. यापैकी तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणी पास्टर राजकुमार येसुदासनवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वाचक हो,
वर उल्लेख केलेल्या तीन ही घटना सत्य आहेत . आरोपींची नांवे खरी आहेत. या तीन घटनांमध्ये भारतातील तीन प्रमुख धर्मियांचे अनुयायी किंवा धर्मगुरु हे आरोपी आहेत. या तीन घटना इथे मांडण्याचे कारण वासनांध नराधमाला धार्मिकतेचे नैतिक बंधन कधीही नसते हे उजेडात आणणे हे आहे.
कारण अलिकडच्या काळात विरुद्ध धर्माच्या , जातीच्या नरपशुने अत्याचार केला की त्यानंतर जो गदारोळ माजवला जातो, जाती-जातीत भांडणं लावली जातात ती फक्त आणि फक्त आपापले राजकीय तंबू मजबूत करण्यासाठीच . पण नेमकं त्यावेळी डोळ्यावर झापडं बांधलेली आणि कानात सोईस्कर बोळे घातलेली जनता अंधारात साप बडवायचं काम करत असते. ठराविक काळ त्या विशिष्ट घटनेचा राजकीय फायदा घेतला की त्यानंतर पुन्हा नियोजन होते पुढची ‘ संधी साधण्याचे ‘.
अत्याचाराविरोधात आवाज उठवलाच पाहिजे पण तो फक्त धर्म बघून राजकीय स्वार्थासाठी नसावा.
अत्याचार करणारा कुठल्याही जातीचा, धर्माचा असो त्याच्याविरुद्ध रान पेटवलेच पाहिजे . त्याचप्रमाणे अशा अत्याचाराला बळी पडलेली पीडिता कुठल्याही जाती-धर्माची असो, तिला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न झालेच पाहिजेत.
पण आपल्याकडे दुर्दैव हेच आहे. जात – धर्म आणि राजकिय गणितं पाहून एखाद्या प्रकरणाला किती ‘ हवा ‘ द्यायची हे ठरवलं जातं आणि त्यानुसार त्या त्या घटनेचं गांभीर्य वाढवलं जातं किंवा अगदी ठरवून अशी घटना दाबलीही जाते.
प्रस्तुत संपादकिय लिहिण्यामागचा हेतू स्पष्ट आहे,
अन्यायाला / अत्याचाराला जातीधर्माच्या तराजूत मोजून माणुसकीची हत्या करण्याचं पाप आपल्या माथी लावून घेऊ नये. एखादयावर आयुष्यातून उठण्याइतपत घडलेल्या अत्याचाराच्या बाबतीत राजकीय घोंगडे पांघरून संबंधितांना थोपटण्याचं किंवा पेटविण्याचं पाप कुणी करु नये.
– किरण डहाळे, संपादक ( नगरी नगरी न्यूज पोर्टल )