पाथर्डीत स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताह भक्तिमय वातावरणात; आरोग्य सेवा आणि नामजपातून समाजजागृती

पाथर्डी I प्रतिनिधी I नगरी नगरी : संतांची भूमी म्हणून राज्यभर ओळख असलेल्या पाथर्डी तालुक्यातील स्वामी समर्थ केंद्रात स्वामी समर्थ…
1 Min Read 0 134

पाथर्डी I प्रतिनिधी I नगरी नगरी :

संतांची भूमी म्हणून राज्यभर ओळख असलेल्या पाथर्डी तालुक्यातील स्वामी समर्थ केंद्रात स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताहानिमित्त आयोजित विविध धार्मिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अखंड नामजप महायज्ञ, गुरुचरित्र पारायण, महिलांची आरोग्य तपासणी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि महाआरती अशा उपक्रमांनी संपूर्ण परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला.

यावेळी बोलताना नगरसेवक अमोल गर्जे यांनी सांगितले की, “पाथर्डीची संतभूमी म्हणून असलेली ओळख स्वामी समर्थ केंद्राच्या विधायक कार्यामुळे अधिक समृद्ध झाली आहे. युद्ध, नैसर्गिक आपत्ती आणि विविध संकटांमधून संपूर्ण विश्वाचे तसेच साधकांचे रक्षण व्हावे, या भावनेतून आयोजित अखंड नामजप महायज्ञ आणि गुरुचरित्र पारायण सोहळा प्रेरणादायी आहे.”

या सप्ताहानिमित्त डॉ. सुवर्णा भापकर आणि मीरा पालवे यांच्या माध्यमातून महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. महिलांना रक्त तपासणी, आरोग्य सल्ला आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन देण्यात आले. कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष देणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शन डॉ. भापकर यांनी केले.

त्यांनी सांगितले की, “संतुलित आहार, भाज्या, फळे, दूध, सुकामेवा, लोह व कॅल्शियमयुक्त पदार्थ यांसोबत नियमित व्यायाम आणि ध्यानधारणा यामुळे महिलांचे आरोग्य चांगले राहू शकते. प्रत्येक घरातील महिला हीच कुटुंबाच्या आरोग्याची खरी शिल्पकार असते.”

सप्ताहाच्या सांगता समारंभात गुरुचरित्र पारायणाची भक्तिपूर्ण सांगता करण्यात आली. या पारायण सोहळ्यात तब्बल ४०१ सेवेकरी सहभागी झाले. नगरसेवक अमोल गर्जे आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शेळके यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली. त्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

यावेळी डॉ. शारदा गर्जे, नगरसेविका मंगल सोनटक्के, मोहटा देवस्थानचे विश्वस्त बाळासाहेब लाहोटी, उद्योजक नरेंद्र बडे आणि सेवेकरी सतीश घाडगे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

सप्ताहभरात गणेश याग, मनोबोध याग, चंडी याग, स्वामी याग, गीताई याग, रुद्रयाग, मल्हार याग, नित्य दत्तपूजन, औदुंबर वृक्ष प्रदक्षिणा, दुर्गासप्तशती पठण, स्वामी चरित्र ग्रंथ वाचन आणि विष्णुसहस्रनाम अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहरातील नागरिकांनी या सर्व उपक्रमांत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

अहिल्यानगरचे सेवेकरी सतीश धाडगे यांनी आधुनिक जीवनशैलीवर भाष्य करताना सांगितले की, “मोबाईलचा अतिरेक, समाजमाध्यमे आणि बाहेरचे खाणे-पिणे यामुळे कौटुंबिक जीवन विस्कळीत होत आहे. पूर्वी घराघरात सात्विक वातावरणात संवाद होत असे; आता एकाच घरातील माणसे मोबाईलवरून बोलतात. अशा परिस्थितीत धर्मविचारच जीवनाला दिशा देऊ शकतो.”

या कार्यक्रमासाठी मधुकर चन्ने, शैलेश चातुर, अभिजीत कुलकर्णी, अभय लबडे, सुनील बांगर, संजय पालवे, चंद्रकांत वारकड, शैला बटुळे, शोभा सदामत, रत्नमाला भागवत आणि शितल बुऱ्हाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

संपूर्ण सप्ताहभर स्वामी समर्थ केंद्र परिसर भाविकांच्या वर्दळीने गजबजलेला दिसत होता आणि श्रद्धा, सेवा व समाजप्रबोधनाचा संगम अनुभवायला मिळत होता.

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media