अहिल्यानगर । प्रतिनिधी । नगरी नगरी :
येथील न्यु लॉ कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेला ‘विविध गुणदर्शन’ सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. संपूर्ण सप्ताहभर विविध उपक्रम, स्पर्धा आणि थीम डेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कला, सर्जनशीलता आणि सामाजिक जाणीवेचे प्रभावी दर्शन घडवले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, एकांकिका आणि नाट्यसादरीकरण यांसारख्या विविध कलाप्रकारांद्वारे केवळ मनोरंजनच केले नाही, तर सामाजिक प्रश्न आणि कायदेविषयक जागरूकतेचे संदेशही प्रभावीपणे मांडले. विद्यार्थ्यांच्या अभिनय आणि सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
सांस्कृतिक सप्ताहात ट्रॅडिशनल डे, साडी-जीन्स डे, मिसमॅच डे आणि बॉलीवूड डे यांसारख्या आकर्षक उपक्रमांनी महाविद्यालयीन वातावरण रंगतदार झाले. त्याचबरोबर लिंबू-चमचा, संगीत खुर्ची, पोत्यातून चालणे आणि क्रिकेट अशा मनोरंजक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. रांगोळी आणि मेहंदी स्पर्धांमधून भारतीय संस्कृतीचे सुंदर दर्शन घडले.
समारोप समारंभात विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके आणि प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी Sham Shinde, प्राचार्य डॉ. एम. एम. तांबे, अधीक्षक हेमा कदम तसेच प्रा. डॉ. रामेश्वर दुसुंगे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. बी. डी. पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वंदना शिरसाट, प्रा. सुहास तोरडमल, प्रा. माऊली मोरे, रियाज शेख, उदय चौधरी आणि किशोर चक्रनारायण यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. संपदा लांडगे आणि कु. रसिका गवळी यांनी केले. महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी मनोरंजनासोबत सामाजिक भान आणि कायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा संदेश दिला, हीच या ‘विविध गुणदर्शन’ कार्यक्रमाची विशेष ठळक बाब ठरली.