शनिशिंगणापूर, देवगड आणि संत ज्ञानेश्वर मंदिर विकास आराखड्यात समाविष्ट करू : आ. प्रसाद लाड

सोनई /शनिशिंगणापूर I प्रतिनिधी I नगरी नगरी : जागतिक कीर्ती लाभलेल्या श्री क्षेत्र शनिशिंगणापूर, श्रीक्षेत्र देवगड आणि श्री क्षेत्र संत…
1 Min Read 0 137

सोनई /शनिशिंगणापूर I प्रतिनिधी I नगरी नगरी :

जागतिक कीर्ती लाभलेल्या श्री क्षेत्र शनिशिंगणापूर, श्रीक्षेत्र देवगड आणि श्री क्षेत्र संत ज्ञानेश्वर मंदिर या तीन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांचा समावेश आगामी विकास आराखड्यात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे शिफारस करण्यात येईल, अशी माहिती भाजपचे प्रवक्ते आमदार प्रसाद लाड यांनी दिली.

आमदार लाड हे शनिदेवाच्या दर्शनासाठी शनिशिंगणापूर येथे आले असता पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित ३५ हजार कोटी रुपयांच्या विकास योजनेत या तीन धार्मिक स्थळांचा समावेश व्हावा, यासाठी स्थानिक आमदारांसह मुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार लाड म्हणाले की, हिंदू धार्मिक स्थळांच्या विकासासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू असून, या भागातील मंदिरांचे आधुनिकीकरण, भाविकांसाठी सुविधा आणि पर्यटन विकास यावर विशेष भर दिला जाणार आहे. शनिशिंगणापूर, देवगड आणि संत ज्ञानेश्वर मंदिर परिसरातील पायाभूत सुविधा उभारल्यास देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांना मोठा लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या संदर्भात स्थानिक आमदार विठ्ठलराव लंघे यांच्यासह इतर आमदारांना घेऊन मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल. भाविकांना सुलभ दर्शन, निवास, रस्ते, स्वच्छता आणि सुरक्षेच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी हा विशेष मुद्दा शासनाकडे मांडला जाईल, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी देवस्थानच्या वतीने आमदार विठ्ठलराव लंघे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी आमदार प्रसाद लाड यांचा सन्मान केला. दर्शनानंतर बोलताना लाड यांनी, “शनिदेवाच्या दर्शनाने मनाला समाधान मिळाले,” अशी भावना व्यक्त केली.

विशेष म्हणजे, त्यांच्या कुटुंबीयांचा त्रिपुरा येथे प्रवास सुरू असल्याने आमदार लाड यांनी पत्नी आणि मुलीसह कुटुंबीयांना लाईव्ह दर्शन घडवून आणले. या प्रसंगाने उपस्थित भाविकांचेही लक्ष वेधले.

दरम्यान, नेवासा मतदारसंघातील राजकीय चर्चांदरम्यान “आम्हीच लंघे यांना शिवसेनेत पाठवले” असे मिश्कील विधान करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

या भेटीदरम्यान केशव पेशवे गडाख, सचिन देसारडा, अंकुश काळे, डॉ. कोलते, अॅड. सयाराम बानकर, किरण जाधव, प्रमोद गजभार, किशोर भुसारी, नामदेव येळवंडे, संदीप बानकर यांच्यासह अनेक सरपंच, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media