अहिल्यानगर । ०२.०३ । नगरी नगरी :
मध्यपूर्व व आखाती प्रदेशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर परदेशात अडकलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून नागरिकांनी मदतीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
मंत्री विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, भारत सरकारचे परराष्ट्र मंत्रालय तसेच महाराष्ट्र शासन, परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी सतत प्रयत्नशील आहे. संबंधित भागातील नागरिकांशी संपर्क साधण्यात आला असून त्यांच्या सुरक्षिततेवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
☎️ जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष
अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांच्या मदतीसाठी विशेष नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. परदेशात अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनी ०२४१-२३२३८४४ किंवा ०२४१-२३५६९४० या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच राज्य सरकारने केंद्र सरकारच्या सूचनेनुसार २४ तास हेल्पलाईन सुरू केली असून, संपर्कासाठी ०२२-२२०२७९९० हा क्रमांक उपलब्ध आहे.
✈️ विमानसेवा बंद; प्रशासनाचे प्रयत्न सुरू
युद्धजन्य परिस्थितीमुळे काही भागांतील विमानसेवा बंद असल्याने नागरिकांना तेथेच थांबावे लागत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व संबंधितांशी संपर्क साधला असून काही नागरिकांशी मंत्री विखे पाटील यांनी वैयक्तिक संवाद साधून दिलासा दिल्याचे त्यांनी सांगितले.
🌐 विविध देशांतील भारतीय दूतावास सज्ज
तात्काळ मदतीसाठी इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), पॅलेस्टाईन (रामल्लाह), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी), कुवैत, बहरीन, मस्कत, जॉर्डन आणि इराक (बगदाद) येथील भारतीय दूतावासांनी २४x७ आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक, व्हॉट्सॲप क्रमांक आणि ईमेल आयडी जाहीर केले आहेत. गरज भासल्यास नागरिकांनी संबंधित दूतावासांशी तात्काळ संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
🤝 प्रशासन नागरिकांच्या पाठीशी
“परदेशात अडकलेल्या प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेसाठी शासन कटिबद्ध आहे. आवश्यकतेनुसार त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत,” असे मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
परदेशात अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनी घाबरून न जाता जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.