अहिल्यानगर | अमोल भांबरकर | नगरी नगरी :
शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या नवीपेठ येथील श्रीराम मंदिर परिसरात रविवार, १९ एप्रिल २०२६ रोजी विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, या निमित्ताने शहरात धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे. या संमेलनाच्या तयारीला सध्या वेग आला असून, आयोजकांकडून मोठ्या प्रमाणावर नियोजन सुरू आहे.
या संमेलनाच्या निमित्ताने सायंकाळी ४.३० वाजता आडते बाजार येथील प्रभू श्रीराम मंदिरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. ही शोभायात्रा डाळ मंडई, तेली खुंट चौक, शहाजीराजे मार्ग, भिंगारवाला चौक, अर्बन बँक रोड मार्गे पुढे जात शहर सहकारी बँक परिसरात पोहोचणार असून, त्यानंतर नवीपेठेतील श्रीराम मंदिरात तिचा समारोप होणार आहे.
या शोभायात्रेत मंगल कलश घेऊन सहभागी होणाऱ्या महिला, पारंपरिक वेशभूषेतील नागरिक, तसेच भगवे ध्वज हाती घेतलेले युवक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. याशिवाय भव्य श्रीराम मूर्ती, स्वसंरक्षणाचे लाठी-काठी व तलवारबाजीचे प्रात्यक्षिक सादर करणाऱ्या मुली, तसेच महापुरुषांच्या वेशभूषेत सहभागी होणारी बालके ही मिरवणुकीची प्रमुख आकर्षणे ठरणार आहेत.
संमेलनाला प्रखर हिंदुत्ववादी वक्ते आणि दिल्ली येथील सुदर्शन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके, पाथर्डी येथील संत हभप गोविंदशास्त्री मुकुंदकाका जाटदेवळेकर महाराज, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कुटुंब प्रबोधन प्रमुख नरेश करपे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या मान्यवरांच्या मार्गदर्शनातून हिंदू समाजातील एकात्मता, संस्कृतीचे जतन आणि राष्ट्रनिर्मितीतील सहभाग यावर विशेष भाष्य केले जाणार आहे.
“हिंदू सारा एक मंत्र हा, दाही दिशांना घुमवू या” या घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाच्या माध्यमातून हिंदू समाजाला संघटित करण्याचा आणि “संघटित हिंदू – समर्थ भारत” हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे. समाजातील जात, पंथ, भाषा आणि प्रांत यांच्या पलीकडे जाऊन ऐक्य निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कोहिनूर व परशुराम वस्ती विराट हिंदू संमेलन समितीच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या संमेलनामुळे अहिल्यानगर शहरात सध्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, धार्मिक आणि सांस्कृतिक अभिमानाची नवचैतन्यपूर्ण लाट निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.