चाळीस रुपयांपासून सुरू झालेला प्रवास… आज चितळे रोडवर यशाची सुगंधी ओळख! संतोष सुरेश आप्रे यांची प्रेरणादायी सक्सेस स्टोरी

सक्सेस स्टोरी । किरण डहाळे । नगरी नगरी : अहिल्यानगर शहरात चितळे रोडवर अगरबत्तीचा सुगंध दररोज पसरवणारे संतोष सुरेश आप्रे…
1 Min Read 0 86

सक्सेस स्टोरी । किरण डहाळे । नगरी नगरी :

अहिल्यानगर शहरात चितळे रोडवर अगरबत्तीचा सुगंध दररोज पसरवणारे संतोष सुरेश आप्रे हे नाव आज अनेकांना परिचित आहे. पण या सुगंधामागे आहे संघर्ष, जिद्द, मेहनत आणि कधीही हार न मानणाऱ्या एका साध्या माणसाची असामान्य कहाणी. फक्त ४० रुपयांच्या भांडवलातून सुरू झालेला व्यवसाय आज अनेकांच्या श्रद्धेचा भाग बनला आहे.

(Success Story) घरची परिस्थिती नाजूक… म्हणून दहावीनंतरच व्यवसायाची सुरुवात : 

सन १९९२ मध्ये घरची परिस्थिती अत्यंत कठीण होती. दहावीची परीक्षा दिल्यानंतर स्वतःचा आणि घरचा थोडाफार खर्च भागावा म्हणून संतोष आप्रे यांनी अगरबत्ती विक्रीचा छोटासा व्यवसाय सुरू केला.

फक्त ४० रुपये भांडवल घेऊन त्यांनी हातात पिशवी घेतली आणि पायी किंवा सायकलवरून अहिल्यानगर शहरातील सावेडी, पाईपलाईन रोड , केडगाव, भिंगार, आलमगीर, फकिरवाडा, मुकुंदनगर, नागापूर MIDC अशा भागांमध्ये घराघरांत जाऊन अगरबत्ती विकायला सुरुवात केली.

सुरुवातीला मोठा संघर्ष… ग्राहक मिळवण्यासाठी करावी लागली धडपड :

(Success story) व्यवसायाची कोणतीही माहिती नसल्यामुळे सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागला. दहा लोकांना विचारल्यानंतर कदाचित एखादाच ग्राहक अगरबत्ती घेत असे.

कधी ग्राहकांना ८–१० प्रकारची पॅकेट्स दाखवावी लागत, तर कधी पॅकेट फोडून अगरबत्ती पेटवून सुगंध दाखवावा लागत असे. तरीही अनेक वेळा ग्राहक नकार देत. काही जण कमी किमतीत मागत. अनेक वेळा अपमानास्पद अनुभवही आले. परंतू या सर्व अनुभवांमधून त्यांनी एक गोष्ट शिकली, संघर्षच माणसाला मजबूत बनवतो.

शिक्षण, नोकरी आणि पुन्हा व्यवसाय… संघर्षाचा काळ :

१९९८ मध्ये त्यांनी बारावीची परिक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर काही कारणामुळे कुटुंबाला जुने घर विकून केडगाव येथील भूषणनगर येथे राहायला जावे लागले.

सन २००१ मध्ये राहुरी फॅक्टरी येथे ITI (वेल्डर ट्रेड) करण्याचा निर्णय घेतला.

त्यासाठी दररोजचा प्रवास अत्यंत कठीण होता.

पहाटे ४.३० ला घरातून निघणे, ५ वाजता रेल्वेने राहुरीला जाणे, स्टेशनपासून ४ किमी पायी चालणे

नंतर ST ने फॅक्टरीपर्यंत प्रवास, रेल्वेमध्ये बसून अभ्यास करणे आणि ITI सुटल्यानंतर अगरबत्ती विकून दुसऱ्या दिवसाचे भाडे जमवणे — असा एक वर्षांचा कठीण संघर्ष करून त्यांनी ITI पूर्ण केले.

यानंतर कायनेटिक कंपनीत अप्रेंटिस, तसेच पुण्यातील टेल्को, बजाज टेम्पो, क्लासिक व्हील अशा कंपन्यांमध्ये संधी मिळाली. काही दिवस फॅब्रिकेशनचे कामही केले.

परंतु वेल्डिंग करताना होणाऱ्या धुरामुळे डोळ्यांना गंभीर त्रास होऊ लागला. अखेर नोकरी सोडून त्यांनी पुन्हा स्वतःच्या अगरबत्ती व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला.

हातगाडीवरून पुन्हा सुरुवात… आणि नशीब पालटले

(Succes Story) वेल्डिंगच्या कामातून जमा झालेल्या पैशातून त्यांनी स्वतःच हातगाडी तयार केली. पुन्हा अगरबत्तीचा व्यवसाय सुरू केला. या वेळी त्यांनी एक महत्त्वाचा बदल केला.

ग्राहकांना विचारणे बंद केले. त्याऐवजी हातगाडीवर सुगंधी अगरबत्ती पेटवून ठेवली. त्या सुगंधाने आकर्षित होऊन ग्राहक स्वतःहून गाडीवर येऊ लागले.

ग्राहक म्हणू लागले,

“तू लावलेली ही अगरबत्तीच आम्हाला दे.”

आजही अनेक ग्राहक भाव न करता म्हणतात,

“तुझ्या मनाने चांगली अगरबत्ती दे.”

चितळे रोडवर स्थिर व्यवसाय

काही वर्षांच्या संघर्षानंतर त्यांना चितळे रोडवर हातगाडी लावण्यासाठी जागा मिळाली अर्थात अशी जागा कायमस्वरुपी नसते. पण त्यावर त्यांचा उदरनिर्वाह सुरु आहे. आज त्यांच्या गाडीवर फक्त अगरबत्तीच नाही तर धूप,

कापूर, वाती, फुलवाती , अत्तर, गोमूत्र, गुलाबपाणी, भस्म असे पूजा साहित्य उपलब्ध असतात .

विविध सुगंधी अगरबत्त्या :

गणपती, महालक्ष्मी, नवरात्र, दिवाळी अशा सणांच्या काळात त्यांच्या गाडीवर मोठी गर्दी असते.

कुटुंबाचा मोठा आधार

या व्यवसायात त्यांच्या पत्नी आणि मुलगी यांचा मोठा हात आहे. सणासुदीच्या काळात त्या गाडीवर येऊन मदत करतात. त्यांचे अनेक मित्रही व्यवसायात साथ देतात.

आई-वडिलांचे निधन… आयुष्यातील मोठा धक्का

२०१३ मध्ये वडिलांचे आणि २०१७ मध्ये आईचे निधन झाले. हेच त्यांचे आयुष्यातील सर्वात मोठे नुकसान होते.

कारण त्यांचा मोठा आधारच हरपला होता. पण त्या जबाबदाऱ्यांनाही त्यांनी धैर्याने सामोरे गेले.

नवीन कल्पना आणि आधुनिकता

ग्राहकांच्या आवडीप्रमाणे त्यांनी व्यवसायात अनेक बदल केले. रंगीत अगरबत्त्या, नवीन सुगंध, विविध प्रकारचे धूप आणि पूजा साहित्य यामुळे ग्राहकांची संख्या सतत वाढत गेली.

यूट्यूबवरही यश :

संतोष आप्रे यांनी “Railway Velapatrak” नावाचे YouTube चॅनल सुरू केले आहे.

तसेच त्यांनी “Vishwakarma Aarti Marathi” या चॅनलवर स्वतःच्या आवाजात भगवान श्री विराट विश्वकर्माच्या आरत्या आणि जयंती गीत प्रकाशित केले आहेत.

सामाजिक बांधिलकी

सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे.

श्री विश्वकर्मा त्वष्टा पांचाळ तांबट समाज, अहिल्यानगर यांच्या समाज मंदिरासाठी त्यांनी पुढाकार घेतला.

समाजाच्या प्रयत्नातून संग्राम भैय्या जगताप यांच्या माध्यमातून १० गुंठे जागा व आमदार निधीतून मंदिर बांधकाम झाले आहे. मंदिरासाठी बेंगळुरू येथून भगवान श्री विराट विश्वकर्माची पंचमुखी मूर्ती तयार करून आणली आहे आणि लवकरच प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

( Success Story ) नवउद्योजकांसाठी त्यांचा संदेश

“कोणताही उद्योग सुरू करण्यापूर्वी तो चालेल का, मला जमेल का असा विचार करत बसू नका. कठोर परिश्रम आणि जिद्द ठेवा. यश मिळेल की नाही हे काळ ठरवेल, पण प्रयत्न कधी वाया जात नाहीत.”

फक्त ४० रुपयांपासून सुरू झालेला प्रवास आज हजारो ग्राहकांच्या विश्वासापर्यंत पोहोचला आहे.

संतोष सुरेश आप्रे यांची ही कथा म्हणजे खऱ्या अर्थाने मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाचा सुगंध दरवळणारी प्रेरणादायी सक्सेस स्टोरी आहे.

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media