अहिल्यानगर । प्रतिनिधी । नगरी नगरी :
सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या ध्येयाने उभारण्यात आलेल्या संस्थेचा लौकिक आज शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमामुळे वाढला आहे, असे प्रतिपादन सेवा शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव रामकिसन देशमुख यांनी केले.
अहिल्यानगर येथील वसंत टेकडी परिसरातील डॉ. नाथ ज . पाऊलबुधे कॉलेज ऑफ फार्मसी येथील पदविका अभ्यासक्रमाच्या प्राचार्या प्रा. अनुराधा चव्हाण यांना औषध निर्माणशास्त्र विषयात विद्यावाचस्पती (PhD) पदवी प्राप्त झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना देशमुख यांनी संस्थेचे संस्थापक स्वर्गीय डॉ. नाथ पाऊलबुधे यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
ते म्हणाले,
“स्वर्गीय डॉ. नाथ पाऊलबुधे यांनी शिक्षणाचा लाभ सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने संस्थेची स्थापना केली. आज त्याच संस्थेतील शिक्षक उच्च शिक्षण संपादन करून विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण करीत आहेत. ही संस्था नावारूपास येण्यामागे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मोठे योगदान आहे.”
प्रा. अनुराधा चव्हाण यांनी “पारंपरिक वनौषधी अर्क आणि त्यांच्या नव्या औषधी संरचनेचे तुलनात्मक प्रमाणीकरण तसेच शरीरातील परिणामांचा अभ्यास” या विषयावर सखोल संशोधन पूर्ण करून ही पदवी संपादन केली. त्यांचे संशोधन औषध निर्माणशास्त्र क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे.
ही पदवी त्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ संलग्न संशोधन केंद्र असलेल्या आर.सी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च सेंटर येथून प्राप्त केली. त्यांच्या संशोधन कार्यासाठी मार्गदर्शक म्हणून डॉ. अनिलकुमार ताटिया यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
या सन्मान समारंभास संस्थेचे खजिनदार दादासाहेब भोईटे, पदवी अभ्यासक्रम विभागाचे प्राचार्य डॉ. श्याम पंगा, सुचित्रा डावरे, विजया नवले, सविता सानप, अनिता सिद्धम, डॉ. वेणू कोला, डॉ. प्रसाद घुगरकर, डॉ. रोशनी सूर्यवंशी, डॉ. विजय तारडे तसेच स्वाती कडनोर उपस्थित होते.
प्रा. अनुराधा चव्हाण यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, सदस्यांनी आणि सहकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या यशामुळे संस्थेच्या शैक्षणिक कार्याच्या गौरवात आणखी भर पडल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.