अहिल्यानगर : बदलती जीवनशैली, धावपळीचे दैनंदिन आयुष्य आणि वाढते आरोग्यविषयक धोके लक्षात घेता नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित करणारे मोफत कोलेस्टेरॉल व रक्तातील साखरेची पातळी तपासणी शिबिर विनायक नगर येथील जैन धर्मस्थानकात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या शिबिराला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
विनायक नगर येथील वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ आणि कृष्णा डायग्नोस्टिक्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये नागरिकांची कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेची पातळी मोफत तपासण्यात आली, तर फुल बॉडी चेकअप अल्पदरात उपलब्ध करून देण्यात आला, ज्याचा अनेकांनी लाभ घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात नवकार मंत्रजाप, परमपूज्य त्रिशालाजी म.सा. यांच्या मंगल आशीर्वचनाने झाली. त्यानंतर श्रीमती तिजाबाई गांधी यांच्या हस्ते धन्वंतरी देवी पूजन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. आरोग्य आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम या प्रसंगी अनुभवायला मिळाला.
यावेळी बोलताना डॉ. रोहित गुगळे यांनी सांगितले की,
“आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने आपल्या आरोग्याला प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक गंभीर आजार सुरुवातीला लक्षणांशिवाय वाढतात. नियमित तपासणीमुळे संभाव्य धोके वेळेवर ओळखता येतात आणि सुदृढ व निरोगी आयुष्य जगता येते.”
त्यांनी विनायक नगर जैन श्रावक संघाने राबविलेल्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुकही केले.
शिबिरासाठी आयोजित करण्यात आलेल्या व्यवस्थेमुळे नागरिकांना अल्पावधीत सुलभ आणि विश्वासार्ह तपासणीची सुविधा उपलब्ध झाली. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुणांनी विशेष उत्साहाने सहभाग घेतला. आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने अशा उपक्रमांची गरज असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाला राजेंद्र भंडारी, डॉ. महावीर गांधी, दिलीप पटवा, राजेंद्र गांधी, विलास पटवा, हिरालाल पटवा, प्रदीप बाबेल, विनोद कटारिया, मनसुख भंडारी, सतीश मांडोत, निखील गांधी, पारस गुंदेचा, सुभाष गुंदेचा, विजय गुगळे, राजेंद्र मेहेर, अमृत कटारिया, संजय भंडारी, संजय संचेती, किशोर गांधी, रसिक बोरा, अशोक बोरा, महावीर बोरा, कांतिलाल कटारिया, चंदू पोखर्णा, गौरव मुनोत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रभागाचे नगरसेवक व माजी उपमहापौर गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, मीनाताई चोपडा आणि सुनिताताई फुलसौंदर यांचे या शिबिरासाठी मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. यावेळी गणेश भोसले यांनी सर्व नगरसेवकांच्या वतीने विनायक नगर श्रावक संघासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या विकास निधीतून नवीन मल्टिपर्पज हॉल उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
विनायक नगर जैन श्रावक संघाचे अध्यक्ष राजेंद्र भंडारी यांनी सांगितले की,
“समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचाव्यात, यासाठी संघाच्या वतीने दरवर्षी समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. आरोग्य जनजागृती ही काळाची गरज असून नागरिकांच्या हितासाठी अशा उपक्रमांना पुढेही प्राधान्य दिले जाईल.”
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विनायक नगर श्रावक संघ, विनायक नगर बहु मंडळाचे सदस्य, डॉक्टर, तंत्रज्ञ आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यसेवेचा संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला.