अहिल्यानगर । प्रतिनिधी । नगरी नगरी :
भिंगार येथील ऐतिहासिक भूमीत आयोजित करण्यात आलेल्या विराट हिंदू संमेलनाला हिंदू समाजाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेकडो युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या संमेलनातून हिंदू एकता, सांस्कृतिक अभिमान आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.
यावेळी बोलताना बजरंग दलाचे अखिल भारतीय सहसंयोजक विवेक कुलकर्णी यांनी, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या कार्यातून भारतमातेला परमोच्च वैभव प्राप्त होईल आणि भारत पुन्हा विश्वगुरू म्हणून उदयास येईल,” असा विश्वास व्यक्त केला.
भिंगार येथील शुक्लेश्वर महादेव मंदिर येथे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनापूर्वी भिंगारमधील प्राचीन मारुती मंदिरापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. भगव्या पताका, पारंपरिक वाद्ये आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या शोभायात्रेत युवकांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. शहरातील विविध भागांतून आलेल्या हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने यात सहभाग घेतला.
आपल्या भाषणात विवेक कुलकर्णी यांनी हिंदू संस्कृतीच्या प्राचीन परंपरेचा उल्लेख करत सांगितले की, हजारो वर्षांच्या आक्रमणांनंतरही हिंदू संस्कृती टिकून राहिली आहे. “हिंदू समाजाचा स्वाभिमान आणि संघटनशक्ती अधिक बळकट व्हावी म्हणून १९२५ मध्ये पूजनीय डॉ. केशव हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. आज जग संघटनेच्या या कार्यपद्धतीकडे आदराने पाहत आहे,” असे ते म्हणाले.
जगात संघर्ष, युद्ध आणि अस्थिरतेचे वातावरण असताना भारतात प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहणे हे भारतीय संस्कृतीच्या पुनर्जागरणाचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले. हिंदू समाजाने जाती-पातीच्या पलीकडे जाऊन एकत्र येण्याची गरज अधोरेखित करत त्यांनी संघटित समाजच राष्ट्रनिर्मितीचे कार्य करू शकतो, असे प्रतिपादन केले.
संमेलनात मेहेकरी येथील संजीवनी गडाचे महंत शंकर भारती महाराज, आळंदी येथील युवा प्रवचनकार ह.भ.प. महादेव महाराज घोडके आणि पुण्यातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते सर्वेश मेहेंदळे यांनीही मार्गदर्शन केले.

युवा प्रवचनकार महादेव महाराज घोडके यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाची आठवण करून देत सांगितले की, हिंदू समाजाने आपल्या परंपरा आणि संस्कृतीचा अभिमान बाळगला पाहिजे. वारकरी संप्रदायाने समाजाला व्यसनमुक्ती, अध्यात्म आणि सामाजिक शिस्त दिली असून त्याचे योगदान अनमोल असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्वेश मेहेंदळे यांनी लव्ह जिहाद आणि लँड जिहाद यांसारख्या प्रश्नांवर भाष्य करत हिंदू समाजाने सजग राहण्याची गरज व्यक्त केली. सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्नांवर जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा संमेलनांची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या संमेलनातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘पंचपरिवर्तन’ या संकल्पनेचाही उल्लेख करण्यात आला. सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्वदेशी आचरण आणि नागरिक कर्तव्य या पाच महत्त्वपूर्ण विषयांवर समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
भिंगार आणि नागरदेवळे परिसरातील नागरिकांनी या संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहत आपला पाठिंबा दर्शविला. राष्ट्रभक्तीच्या घोषणांनी आणि ‘वंदे मातरम्’ च्या सामूहिक गायनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
भिंगारच्या ऐतिहासिक भूमीत भरलेल्या या विराट हिंदू संमेलनाने संघटन, संस्कार आणि समाजजागृतीचा संदेश देत उपस्थितांच्या मनात नवचैतन्य निर्माण केले.