अफवांना बळी पडू नका; समता पतसंस्थेचे व्यवहार पारदर्शक – संदीप कोयटे यांचे स्पष्टीकरण

कोपरगाव | प्रतिनिधी | किसन पवार : समता पतसंस्थेचे सर्व व्यवहार पूर्णपणे पारदर्शक आणि कायद्याच्या चौकटीत होत असून कोणत्याही प्रकारच्या…
1 Min Read 0 151

कोपरगाव | प्रतिनिधी | किसन पवार :

समता पतसंस्थेचे सर्व व्यवहार पूर्णपणे पारदर्शक आणि कायद्याच्या चौकटीत होत असून कोणत्याही प्रकारच्या अफवा किंवा दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन संस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी सरव्यवस्थापक सचिन भट्टड उपस्थित होते.

कोयटे यांनी सांगितले की, समता पतसंस्थेची ग्राहक संख्या सुमारे १ लाख १० हजार असून वार्षिक उलाढाल सुमारे २००० कोटी रुपये इतकी आहे. गेल्या ४० वर्षांपासून संस्थेने शिस्तबद्ध व कायदेशीर पद्धतीने काम करत विश्वासार्हता निर्माण केली आहे. भविष्यातही याच पद्धतीने पारदर्शक कारभार सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रभर विस्तारलेले असल्यामुळे कुणीही खाते उघडून व्यवहार करू शकतो. अशोक खरात यांच्याशी संबंधित खाती आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनच उघडण्यात आली असून त्या माध्यमातून झालेले सर्व व्यवहार नियमांनुसारच झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिर्डी पोलिसांनी मागवलेली सर्व माहिती अवघ्या दोन तासांत सादर करण्यात आली असून त्यांच्या सूचनेनुसार संबंधित खाती तत्काळ गोठवण्यात आली आहेत. यावरून संस्थेची प्रशासनाशी असलेली सहकार्याची भूमिका अधोरेखित होते, असेही कोयटे म्हणाले.

ठेवीदारांच्या सुरक्षेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, संस्थेच्या ९९ टक्के खातेदारांची ६० लाख रुपयांपर्यंतची रक्कम ‘लिक्विडिटी बेस्ट प्रोटेक्शन स्कीम’ अंतर्गत सुरक्षित आहे. त्यामुळे ठेवीदारांनी कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नसून संस्था सक्षम व विश्वासार्ह आहे.

याशिवाय, एका सामाजिक कार्यक्रमात अशोक खरात आणि चेअरमन काका कोयटे यांची झालेली भेट ही केवळ औपचारिक असून त्या छायाचित्रांच्या आधारे चुकीचे निष्कर्ष काढू नयेत, असे आवाहनही करण्यात आले.

दरम्यान, पोलिसांच्या सूचनेनुसार तपासाची गोपनीयता राखली जात असून संस्थेकडून पूर्ण सहकार्य दिले जात आहे. संबंधित व्यवहार मे २०२१ ते जानेवारी २०२६ या कालावधीत झाले असून सध्या त्या खात्यांमध्ये सुमारे ३० लाख रुपये शिल्लक आहेत. सर्व व्यवहार ऑनलाइन पद्धतीने झाले असल्याची माहितीही देण्यात आली.

📌 ठळक मुद्दे

१.१० लाख खातेदारांचा संस्थेवर विश्वास कायम

२ तासांत पोलिसांना माहिती सादर

संबंधित खाती तात्काळ गोठवली

९९% ठेवीदारांची ६० लाखांपर्यंत रक्कम सुरक्षित

४० वर्षांची विश्वासार्ह परंपरा कायम

समता पतसंस्थेने पारदर्शकतेची भूमिका स्पष्ट करत अफवांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला असून, ठेवीदारांनी घाबरून न जाता संयम राखावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media

Share this content