अहिल्यानगर | प्रतिनिधी | नगरी नगरी :
सावेडी येथील गुलमोहोर रोड पोलीस चौकी परिसरात वंचित बहुजन आघाडी प्रणित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार युवा मंचाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड आणि आरटीओ अधिकारी शंकर कराळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात बोलताना वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी सामाजिक समतेचा विचार मांडताना सांगितले की, “महात्मा फुले यांनी अन्यायकारक व्यवस्थेविरोधात क्रांतीची बीजे पेरली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला समतेचे संविधान दिले. त्यामुळे समतेचा विचार हाच आमच्यासाठी खरा उत्सव आहे.” त्यांच्या भाषणाने उपस्थितांमध्ये सामाजिक भान अधिक दृढ झाले.
प्रमुख वक्ते ॲड. सुरेश लगड यांनी संविधानाचे महत्त्व अधोरेखित करताना स्पष्ट केले की, “संविधान हे केवळ नियमांचे पुस्तक नसून कोट्यवधी शोषितांच्या न्यायाचे अभेद्य सुरक्षा कवच आहे. आजच्या काळात कायद्याचे ज्ञान हेच सर्वात मोठे शस्त्र असून युवकांनी संविधानाच्या बळावर स्वतःला सक्षम केले पाहिजे.” त्यांनी युवकांना संविधानिक मूल्यांची जाण ठेवून सजग नागरिक बनण्याचे आवाहन केले.
आरटीओ अधिकारी शंकर कराळे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, “बाबासाहेबांचे विचार केवळ स्मरणात न ठेवता ते आचरणात आणणे हीच खरी प्रगती आहे. युवकांनी व्यवस्थेचे गुलाम न बनता ‘सिस्टम मेकर’ होण्याचा संकल्प केला पाहिजे.” त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी तरुणांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला.
या प्रसंगी बौद्धाचार्य दीपक पाटोळे, अशोक औटी, सुधीर ठोंबे, अमर निर्भवने, ॲड. लक्ष्मीकांत पठारे, सचिन ठोंबे, सावन मकासरे, अशोक देवडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच युवा मंचाचे अध्यक्ष देविदास भालेराव, उपाध्यक्ष प्रतीक जाधव आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी मंचाचे अध्यक्ष देविदास भालेराव आणि उपाध्यक्ष प्रतीक जाधव यांनी उपस्थित मान्यवर, भीमसैनिक आणि पोलीस प्रशासनाचे आभार मानले. सामाजिक समता, शिक्षण आणि संविधानिक मूल्यांचा संदेश देणारा हा कार्यक्रम सावेडीत विशेष ठरला.