“आई ही संस्काराची पहिली शाळा” – डॉ. तात्याराव लहाने ऋणानुबंधचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

अहिल्यानगर । प्रतिनिधी । नगरी नगरी : समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यासाठी आयोजित ऋणानुबंध संस्थेचा २०२४–२५…
1 Min Read 0 134

अहिल्यानगर । प्रतिनिधी । नगरी नगरी :

समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यासाठी आयोजित ऋणानुबंध संस्थेचा २०२४–२५ चा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा अहिल्यानगर येथील माऊली सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून “आई ही मुलांची पहिली शाळा आणि पहिला गुरु असते,” असे सांगत उपस्थितांना प्रेरणादायी संदेश दिला.

महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात समाजात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून समाजाला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याची परंपरा ऋणानुबंध संस्थेने जपली आहे.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, महापौर सौ. ज्योती गाडे, डॉ. गिरीश कुलकर्णी, नितीन उदमले, बेरड सर आदी मान्यवर उपस्थित होते.

डिजिटल डिटॉक्स मोहिमेची माहिती

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे सचिव प्रशांत बंडगर यांनी प्रास्ताविक केले. तर संस्थेचे अध्यक्ष अजित रोकडे यांनी ऋणानुबंध संस्था आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या “डिजिटल डिटॉक्स इंडिया” मोहिमेची माहिती दिली.

मुलांच्या मोबाईलच्या अतिवापराविरोधात सुरू असलेल्या या मोहिमेत आतापर्यंत २१० शाळांमधील सुमारे २१ हजार पालकांचे समुपदेशन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव

या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना ऋणानुबंध राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानित महिलांमध्ये –

जामखेड येथील पारंपरिक लाकडी वस्तूंचा व्यवसाय ऑनलाईन माध्यमातून जागतिक स्तरावर पोहोचविणाऱ्या दैवशाला गुळवे

मवेशी राजुरसारख्या आदिवासी भागात शिक्षण व महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या मुख्याध्यापिका मंजुषा काळे

यवतमाळ येथील सरकारी रुग्णालयात रुग्ण व नातेवाईकांना मोफत भोजन देणाऱ्या सुमनताई सोनवणे

कृषी ड्रोनद्वारे शेतात औषध फवारणी करणाऱ्या नीलम दिवेकर

मानस ग्राम स्नेहालयात मुलांच्या डिजिटल व्यसनावर मानसोपचार करणाऱ्या डॉ. तेजस्विनी मिस्कीन

अहिल्यानगर येथील डॉ. गौरी कुलकर्णी

मुळा धरण परिसरातील शिक्षिका मंदा फलके

यांचा गौरव करण्यात आला. तसेच श्रीमती रजनी बोर्डे यांना आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष सन्मान देण्यात आला.

डॉ. लहाने यांचे हृदयस्पर्शी भाषण

डॉ. तात्याराव लहाने यांनी सुमारे सव्वा तास चाललेल्या भाषणातून उपस्थितांना अक्षरशः खिळवून ठेवले. त्यांच्या ग्रामीण शैलीतील आणि हृदयाला भिडणाऱ्या शब्दांनी सभागृहातील श्रोते मंत्रमुग्ध झाले.

आपल्या जीवनप्रवासातील अनुभव सांगताना त्यांनी सांगितले की, ३१ वर्षांपूर्वी दोन्ही किडन्या निकामी झाल्यानंतर त्यांच्या आईने स्वतःची किडनी दान केली. त्या प्रसंगाची आठवण सांगताना उपस्थितांचे डोळे पाणावले.

आरोग्य जपण्यासाठी जंक फूड टाळावे, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा आणि मोबाईलचा वापर मर्यादित ठेवावा, असा सल्लाही त्यांनी दिला. मोबाईलमधून निर्माण होणाऱ्या लहरींचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे ब्लूटूथ किंवा हेडफोन वापरण्याचे तसेच मोबाईल झोपताना दूर ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

तसेच ऋणानुबंध संस्थेच्या डिजिटल डिटॉक्स इंडिया मोहिमेचेही त्यांनी विशेष कौतुक केले.

इतर मान्यवरांचे मार्गदर्शन

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी ऋणानुबंध संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक करून सन्मानित महिलांचे अभिनंदन केले. डिजिटल साधनांचा संतुलित वापर करण्याचे महत्त्व त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पुरस्कारासाठी विविध क्षेत्रातील वेगळे काम करणाऱ्या महिलांची निवड झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या सन्मानामुळे महिलांना अधिक प्रेरणा मिळेल आणि त्यांचे कार्य समाजासाठी दिशादर्शक ठरेल, असे त्यांनी सांगितले.

महापौर सौ. ज्योती गाडे यांनी उपस्थितांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत सर्व सन्मानमूर्तींचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाची सांगता

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष प्रा. सारिका रघुवंशी यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऋणानुबंधच्या कलाकारांनी सादर केलेल्या गीतांनी उपस्थितांचे मन जिंकले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन परदेशी, डॉ. विवेकानंद कंगे, डॉ. खंडागळे, भानुदास महानूर, महेश घावटे, जीवन महाजन, प्रतिभा साबळे, अजय आदमाने, सोमवंशी दांपत्य, वंदना कुलकर्णी, प्राची लाटे, सीमा रघुवंशी, स्वाती कुमठेकर, आंबेकर, विजय मोरे, बाबासाहेब जगताप, मोनाली डॉ. झेंडे, उमेशचंद्र सुद्रिक तसेच ऋणानुबंध संस्थेच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media