१४ मार्च रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर’; महसुली प्रश्नांचे एकाच छताखाली तात्काळ निराकरण

अहिल्यानगर । राजेंद्र देवढे । नगरी नगरी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने राज्य शासनातर्फे ‘छत्रपती शिवाजी…
1 Min Read 0 234

अहिल्यानगर । राजेंद्र देवढे । नगरी नगरी

महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने राज्य शासनातर्फे ‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा–१)’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शनिवार, दि. १४ मार्च २०२६ रोजी जिल्ह्यातील विविध महसूल मंडळ स्तरांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.
या शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांच्या महसुली तक्रारी व प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यावर भर देण्यात येणार आहे. शासनाच्या विविध सेवा आणि सुविधा नागरिकांना ‘एकाच छताखाली’ उपलब्ध करून देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
📍 या मंडळांमध्ये होणार शिबिरांचे आयोजन
१४ मार्च रोजी जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील निश्चित महसूल मंडळांमध्ये ही शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. त्यामध्ये –
अहिल्यानगर तालुका – नागापूर
नेवासा – भानसहिवरे
पारनेर – पळशी
पाथर्डी – तिसगाव
शेवगाव – ढोरजळगाव
कर्जत – कुळधरण व भांबोरा
जामखेड – खर्डा
संगमनेर – घुलेवाडी
अकोले – समशेरपूर
श्रीरामपूर – बेलापूर
राहुरी – बारागाव नांदूर व सात्रळ
राहाता – अस्तगाव
कोपरगाव – रवंदे
या ठिकाणी मंडळ स्तरावर महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडविण्याचा प्रयत्न करणार आहेत.
📑 एक खिडकी प्रणालीद्वारे विविध सेवा
या शिबिरांमध्ये ‘एक खिडकी’ प्रणाली राबविण्यात येणार असून सर्व महसूल अधिकारी एकाच ठिकाणी उपस्थित राहून नागरिकांना त्वरित सेवा देणार आहेत. यामध्ये पुढील सेवा उपलब्ध असतील –
प्रलंबित फेरफार प्रकरणांचे निकाली काढणे
सातबारा व ८-अ उताऱ्यांतील दुरुस्त्या
डिजिटल सातबारा वितरण
महाभूमी पोर्टलवरील डिजिटल सातबाराबाबत जनजागृती
उत्पन्न, जात, रहिवासी व नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्रे तात्काळ उपलब्ध
ई-मोजणी, ई-फेरफार सेवा
अ‍ॅग्रीस्टॅक व पीएम किसान योजनांबाबत मार्गदर्शन
सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे मंजुरी आदेश
📢 नव्या महसूल तरतुदींबाबत मार्गदर्शन
या शिबिरांमध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील नव्या तरतुदींबाबतही नागरिकांना माहिती दिली जाणार आहे. अंतिम विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या जमिनींच्या अकृषक रूपांतरणासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची आवश्यकता नसल्याची माहितीही देण्यात येणार आहे.
तसेच जुनी सनद पद्धत रद्द करून एकवेळ अधिमूल्य भरण्याची सुलभ व्यवस्था लागू करण्यात आल्याबाबतही नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.
📅 मार्च ते मेदरम्यान टप्प्याटप्प्याने शिबिरे
‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर अभियान’ मार्च ते मे या कालावधीत टप्प्याटप्प्याने संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.
१० एप्रिल व १७ एप्रिल – मंडळ स्तरावरील शिबिरे
८ मे व १५ मे – नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावरील शिबिरे
🏢 जिल्हास्तरीय समितीची स्थापना
अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह १४ मार्च रोजी आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिरा’त उपस्थित राहून आपल्या महसुली समस्या सोडवून घ्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media

Share this content